Coronavirus: कोरोना लसीमुळे वृद्धांमध्ये निर्माण झाली युवकांइतकीच रोगप्रतिकारशक्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2020 02:06 AM2020-08-28T02:06:10+5:302020-08-28T02:06:22+5:30
मॉडेर्ना कंपनीचा दावा; रुग्णांमध्ये गंभीर दुष्परिणामांची नोंद नाही
नवी दिल्ली : अमेरिकेतील जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील मॉडेर्ना ही कंपनीदेखील कोरोना प्रतिबंधक लस विकसित करीत असून, ही लस टोचलेल्या वृद्ध रुग्णांमध्ये तरुण रुग्णांइतकीच रोगप्रतिकारशक्ती निर्माण झाली, असा दावा या कंपनीने केला आहे.
ही लस ५६ वर्षे तसेच त्याहून अधिक वयाच्या २० जणांना टोचण्यात आली. त्यावेळी त्यांच्यात निर्माण झालेल्या रोगप्रतिकारशक्तीचे प्रमाण युवकांइतकेच होते, असे आढळून आले. कोरोनाची लागण झाल्यानंतर वयोवृद्ध लोकांना सर्वात जास्त धोका निर्माण होतो. या संसर्गामुळे बळी पडलेल्यांमध्ये वृद्धांचे प्रमाण लक्षणीय आहे. एकाहून अधिक आजार असलेल्यांना कोरोनामुळे जीव गमवावा लागल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे मधुमेह, रक्तदाब असे विकार असलेल्या वृद्धांना कोरोनाचा संसर्ग होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन विविध देशातील सरकारे वारंवार करीत आहेत.
या कंपनीने म्हटले आहे की, आम्ही विकसित करीत असलेली कोरोना प्रतिबंधक लस ज्यांना टोचली त्यांच्या प्रकृतीवर कोणतेही गंभीर दुष्परिणाम झाले नाहीत. काही रुग्णांना लस टोचल्यावर थकवा, डोकेदुखीचा त्रास झाला; पण अशी लक्षणे दिसतील याची तज्ज्ञांना पूर्वकल्पना होती.
विविध कंपन्या, देशांमध्ये सुप्त स्पर्धा
ऑक्सफर्ड व अॅस्ट्राझेनिसा या कंपनीच्या संयुक्त प्रयत्नांतून विकसित करण्यात आलेल्या लसीच्या मानवी चाचण्यांचा दुसरा टप्पा भारतात सुरू झाला आहे. ही लस विकसित करण्यात आॅक्सफर्डला यश येईलच, असे काही तज्ज्ञ सांगत असतानाच मॉडेर्ना कंपनीने आपल्या प्राथमिक निष्कर्षांतून कोरोनाच्या वृद्ध रुग्णांनाही दिलासा दिला आहे. जगभरात कोरोना लस विकसित करण्यासाठी विविध कंपन्या व देशांत एक प्रकारची स्पर्धा सुरू आहे. त्यात आता मॉडेर्नाने आपले पत्ते उघड करून शर्यतीत पुढे जाण्याचा प्रयत्न केला आहे.