बंगळुरू - गेल्या दीड वर्षापासून धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना विषाणूला रोखण्यासाठी लसीकरणावर जोर दिला जात आहे. मात्र कोरोना विषाणूचे काही व्हेरिएंट्स लसीलाही दाद देईनासे झाले आहेत. अशा परिस्थितीत लस संशोधन करणाऱ्या जगतातून एक खूशखबर आली आहे. इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्स आणि बायोटेक कंपनी मिनव्हॅक्सकडून विकसित करण्यात आलेली वॉर्म व्हॅक्सिन कोरोना विषाणूच्या सर्व व्हेरिएंटविरोधात शरीरामध्ये अँटीबॉडी विकसित करण्यामध्ये यशस्वी ठरत आहे. ही लस ९० मिनिटांपर्यंत १०० डिग्री तापमानातही सुरक्षित राहू शकत असल्याने तिला वॉर्म व्हॅक्सिन असे म्हटले जात आहे. तसेच ही लस ३७ डिग्री सेल्सियस तापमानामध्ये स्थिर राहू शकते. (India's worm vaccine will be effective on all variants of corona, safe even at 100 degree)
ही लस इतर लसींपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. कारण इतर लसी ह्या खूप कमी तापमानामध्ये साठवाव्या लागतात. ही बाब ऑस्ट्रेलियाच्या CSIRO कडून या लसीच्या स्वतंत्रपणे करण्यात आलेल्या विश्लेषणात नमूद करण्यात आली आहे. याबाबत डिटेल्स एसीएस इंफेक्शियस डिजीजेज जर्नलमध्ये प्रकाशित झाली आहे. त्यात देण्यात आलेल्या माहितीनुसार उंदीर आणि हॅमस्टरमध्ये या लसीमुळे विषाणूंविरोधात जबरदस्त इम्युन सिस्टिम विकसित झाला. ही लस कोरोना विषाणूच्या स्पाइक प्रोटिनच्या एका भागात करण्यात आलेल्या बदलाच्या माध्यमातून तयार करण्यात आली आहे.
बायोटेक फर्म मायनव्हॅक्ससोबत संयुक्तपणे काम करत अशलेल्या भारतीय विज्ञान संस्थेच्या संशोधकांनी वॉर्म व्हॅक्सिन फॉर्मुलेशनची निर्मिती केली आहे. प्राण्यांवर करण्यात आलेल्या अभ्यासामध्स समोर आलेल्या माहितीनुसार ही लस कोरोनाच्या सर्व चिंताजनक व्हेरिएंट (अल्फा, बीटा, कप्पा, डेल्टा) या सर्वांविरोधात प्रभावी आहे. एसीएस इंफेक्शियस डिजीज जर्नलमध्ये गुरुवारी प्रकाशित झालेल्या या रिसर्चमधून या वॉर्म व्हॅक्सिनच्या फॉर्म्युल्यामुळे उंदरांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिकारशक्ती निर्माण झाल्याचे समोर आले आहे.
हे फॉर्म्युलेशन ३७ डिग्री सेंटिग्रेड तापमानामध्ये एका महिन्यापर्यंत स्थायी राहू शकते. तसेच १०० डिग्री तापमानामध्ये ९० मिनिटांपर्यंत राहू शकते. त्यामुळेच या फॉर्म्युलेशनला वॉर्म व्हॅक्सिन असे नाव देण्यात आले आहे.