नवी दिल्ली – भारतात कोरोना लसीच्या आपत्कालीन वापरासाठी सीरम इंस्टिट्यूटच्या कोविशिल्ड लसीला परवानगी मिळाली आहे. त्याचसोबत भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनलाही परवानगी देण्यात आली आहे. देशभरात कोरोना लसीकरणाच्या तयारीची सुरूवात झाली आहे. देशात अनेक ठिकाणी कोरोना लसीकरणाचं ड्राय रनही घेण्यात आलं, आता प्रतिक्षा लागून राहिलेली ती म्हणजे १६ जानेवारीची, ज्यादिवशी प्रत्यक्षात देशात कोरोना लसीकरणाची मोहीम सुरू होणार आहे.
पुण्याच्या सीरम इंस्टिट्यूटने मंगळवारी पहाटे देशाच्या विविध भागात कोरोना लसीचा पुरवठा करण्यास सुरूवात केली आहे. राजधानी दिल्लीत कोरोना लसीचा कंटेनर पोहचला आहे. सीरम इंस्टिट्यूटच्या विशेष कंटेनरमधून लसीची वाहतूक केली जात आहे. एअर इंडियाकडूनही अधिकृत निवेदन देण्यात आले आहे की, पुणे ते अहमदाबाद पर्यंत ते कोविशिल्ड लसीचा पुरवठा करणार आहे. त्यांच्या पहिल्या कंटेनरचं वजन ७०० किलो ग्रॅम आहे. ज्यात २ लाख ७६ हजार लसीचे डोसचा पुरवठा होत आहे.
तामिळनाडू सरकारनेही माहिती दिली आहे की, पुण्याहून त्यांच्यासाठी कंटेनर रवाना झाला आहे. पहिल्या टप्प्यात ५ लाख ५६ हजार डोस उपलब्ध आहेत. तसेच भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनचेही २० हजार डोस तामिळनाडू सरकारने मागवले आहेत. दिल्ली एअरपोर्टवर कोरोना लस ठेवण्यासाठी २० ते २५ डिग्री तापमानाची क्षमता आहे असं सांगितले आहे. त्याचसोबत दोन्ही टर्मिनलवर एका दिवसात ५.७ मिलियन डोस ठेवण्याची क्षमता आहे. एअरपोर्ट प्रशासनाकडून सरकार, एजेंसिया, एअरलाइन्स आणि अन्य सर्व यंत्रणांना संपर्क करण्यात आला आहे आणि लसीकरणाच्या कार्यात महत्त्वाची भूमिका निभावण्यासाठी तयारी करण्यात आली आहे.
केंद्र सरकारने आतापर्यंत सीरम इंस्टिट्यूटकडून १ कोटीहून अधिक डोसची ऑर्डर दिली आहे. ज्याचा पुरवठा मंगळवारपासून सुरू करण्यात आला आहे. त्याशिवाय भारत सरकारने सीरम इंस्टिट्यूट आणि भारत बायोटेकला ५-६ कोटी डोस तयार ठेवण्यास सांगितले आहे. ज्याचा वापर सुरूवातीच्या टप्प्यात केला जाणार आहे. मंगळवारी सकाळी कोरोना लसीचा माल सीरम इंस्टिट्यूटमधून रवाना झाला, इंस्टिट्यूटच्या विशेष ट्रकातून हा माल रवाना केला आहे. त्यासोबत यावर जीपीएस लावून पोलिसांच्या कडक बंदोबस्तात ठेवण्यात आला आहे.
कोविशिल्डचे बॉक्स पुणे एअरपोर्टवर नेण्यासाठी ३ विशेष कंटेनरची व्यवस्था केली होती, या ट्रकात ३ डिग्री तापमानात कोविशिल्ड पुणे एअरपोर्टवर नेली, याठिकाणाहून ८ विशेष विमाने देशातील १३ विविध भागात पोहचणार आहेत. पहिली फ्लाइट दिल्ली एअरपोर्टसाठी सकाळी ८ वाजून ११ मिनिटांनी रवाना झाली, त्यानंतर दिल्लीहून विविध भागात ही लस पोहचवली जाईल. पुढील काही दिवसात ५ आणखी कंटेनर गुजरात, एमपी आणि हरियाणा येथे पाठवले जातील. जीपीएस सुविधा सध्या ३०० कंटेनरला लावण्यात आले आहेत, आवश्यकता भासल्यास आणखी ५०० कंटेनरला जीपीएस लावण्यात येईल.
१६ जानेवारीपासून देशात कोरोना लसीकरणाला सुरूवात होईल, पुढील काही महिन्यात ३० कोटी लोकांना लस देण्याचं उद्दिष्ट भारत सरकारने ठेवलं आहे. जगातील अन्य काही देशांनी तीन-चार आठवड्यांपूर्वी लसीकरणाला सुरूवात केली आहे, परंतु आतापर्यंत केवळ अडीच कोटी लोकांना लस देण्यात आल्याची माहिती आहे.