नवी दिल्ली : काेराेनाच्या दुसऱ्या लसीवर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियातर्फे काम सुरू करण्यात आले आहे. ‘काेविशिल्ड’नंतर आता ‘सीरम’तर्फे ‘काेवाेवॅक्स’ या लसीची भारतात चाचणी सुरू करण्यात आली आहे. ही लस यावर्षी सप्टेंबरपर्यंत उपलब्ध हाेऊ शकते, अशी माहिती ‘सीरम’चे सीईओ अदर पूनावाला यांनी दिली.
अदर पूनावाला यांनी याबाबत ट्वीट करून सांगितले, की ‘काेवाेवॅक्स’ची भारतात चाचणी सुरू झाली आहे. आफ्रिका आणि ब्रिटनमध्ये आढळलेल्या नव्या प्रकारच्या काराेना विषाणूविराेधातही या लसीची चाचणी करण्यात आली आहे. या लसीची एकूण कार्यक्षमता ८९ टक्के आहे. सप्टेंबरपर्यंत लस उपलब्ध हाेण्याची अपेक्षा आहे. ‘सीरम इन्स्टिट्यूट’ ही जगातील सर्वात माेठी लस उत्पादक कंपनी असून कंपनीतर्फे सध्या ‘काेविशिल्ड’ लसीचे उत्पादन करण्यात येत आहे. ही लस सर्वप्रथम भारतामध्ये पुरविणार असल्याचे पूनावाला यांनी स्पष्ट केले हाेते.