पंजाबमधील अमृतसर आंतरराष्ट्रीय विमानतळावर इटलीहून आलेल्या एका विमानातील 125 प्रवासी कोरोना संक्रमित आढळून आले आहेत. या विमानात एकूण 179 प्रवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. या सर्व प्रवाशांना अमृतसरमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने अमृतसर एअरपोर्टचे डायरेक्टर व्हीके सेठ यांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. येथे गेल्या 24 तासांत कोरोनाचे 90,928 नवे रुग्ण आढळून आले आहेत. याशिवाय 325 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. बुधवारच्या तुलनेत गुरुवारी 56.5 टक्के अधिक रुग्ण आढळून आले आहेत.
'या' 5 राज्यांत सर्वाधिक रुग्ण -देशातील पाच राज्यांमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. यात महाराष्ट्रात 26,538, पश्चिम बंगालमध्ये 14,022, दिल्लीत 10,665, तामिळनाडूत 4,862 आणि केरळमध्ये 4,801 नवे कोरोना बाधित आढळून आले आहेत. नव्या 90,928 रुग्णांपैकी 66.97 टक्के रुग्ण केवळ या पाच राज्यांतूनच समोर आले आहेत. यामध्ये 29.19 टक्के रुग्ण केवळ महाराष्ट्रातील आहेत. महत्वाचे म्हणजे, या 5 राज्यांमध्ये देशातील एकूण रुग्णसंख्येच्या 66 टक्के रुग्ण आढळून आले आहेत.
देशात ओमायक्रॉनचे 2,630 रुग्ण -Omicron प्रकाराबद्दल बोलायचे झाल्यास, देशातील ओमायक्रॉन बाधितांची संख्या आता 2,630 वर पोहोचली आहे. महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये ओमिक्रॉनचे सर्वाधिक म्हणजेच प्रत्येकी 797 आणि 465 रुग्ण आहेत. ओमिक्रॉनच्या 2,630 रुग्णांपैकी 995 रुग्ण बरेही झाले आहेत.