चंदिगड - कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार माजवला होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग अगदी कमी झाल्याने देशाला दिलासा मिळाला आहे. मात्र अशा परिस्थितीत पंजाबमध्ये कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा डोके वर काढल्याचे दिसत आहे. पंजाबमध्ये कोरोनाचा संसर्ग दर वेगाने वाढत असून, हा वेग असाच कायम राहिला तर महिन्याच्या अखेरीस राज्यामध्ये कोरोना रुग्णांमध्ये ३०० टक्के रुग्णवाढ होण्याची भीती वर्तवली जात आहे.
राज्यामध्ये दिवाळीनंतर कोरोनाच्या रुग्णांमध्ये पुन्हा वाढ होऊ लागला आहे. राज्याने आठ नोव्हेंबर रोजी ४.२ टक्क्यांची वाढ नोंद केली होती. तसेच १३ नोव्हेंबर रोजी या वाढीचा दर १०.३ टक्क्यांपर्यंत वाढला होता. माध्यमातील रिपोर्टनुसार पंजाबमध्ये १४ नोव्हेंबर रोजी कोरोनाच्या ४७ रुग्णांची नोंद झाली होती. मात्र ही संख्या २७ नोव्हेंबरपर्यंत वाढून १८९ पर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पंजाबमध्ये राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये दुसऱ्या क्रमांकाची रुग्णवाढ नोंद होईल.
राज्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी या रुग्णवाढीसाठी दिवाळीदरम्यान वाढलेल्या वर्दळीला जबाबदार ठरवले आहे. मात्र आता सणावारांचा हंगाम संपला असून, सर्व जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सर्व आवश्यक उपाय लागू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पंजाब कोविड-१९चे नोडल अधिकारी राजेश भास्कर याने सांगितले की, सर्व जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या चाचण्या वाढवण्याचे आणि व्यवस्थापनाचे उपाय सक्तीने लागू करण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत.
गेल्या सात दिवसांतील सरासरीनुसार पंजामध्ये प्रति दशलक्ष लोकसंख्येवर १ हजार ४८ चाचण्या करण्यात आल्या आहेत. हा आकडा राष्ट्रीय सरासरी ९२९ पेक्षा १२ टक्क्यांनी अधिकआहे. तर शेजारील राज्य असलेल्या हरियाणापेक्षा ३२ टक्क्यांनी अधिक आहे. पंजाबचे शेजारील राज्य असलेल्या हिमाचल प्रदेशमध्येही कोरोनाच्या दैनिक रुग्णांमध्ये वाढ होत आहे. पुढच्या दोन आठवड्यांमध्ये येथील रुग्णवाढीचा आकडा १३३ पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.