नवी दिल्ली - चीनसोबतची खुली सीमा आणि मोठ्या प्रमाणावर चीनी नागरिकांशी संपर्क, याचा परिणाम आता पाकिस्तानात स्पष्टपणे जाणवू लागला आहे. पाकिस्तानात कोरोनाने मोठ्या प्रमाणावर हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. एका संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, आता पाकिस्तानी लष्करातही कोरोनाने शिरकाव केला आहे.
पाकिस्तानने एकूण 230 सैनिकांना कोरोनाच्या संशयामुळे आयसोलेशनमध्ये पाठवले आहे. यापैकी 40 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. विशेष म्हणजे यात पकिस्तानी लष्कराच्या अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याचे समजते.
संबंधित संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, गिलगिट- बाल्टिस्तानमध्ये 28, डोमेलमध्ये 41, बागमध्ये 9, रावलाकोटमध्ये 14, मीरपूरमध्ये 45 आणि खैबर पख्तुनख्वामध्ये 55 पाकिस्तानी सैनिकांना क्वारंटाइनमध्ये पाठवण्यात आले आहे. तर मुझफ्फराबादमध्ये 21, रावलाकोटमध्ये 9, कोटलीमध्ये 2, बलुचिस्तानमध्ये 8, तसेच खैबर पख्तुनख्वा आणि पंजाबमध्ये प्रत्येकी एक सैनिक पॉझिटिव्ह आढळून आला आहे.
पाकिस्तानने आपल्या पंजाबसारख्या महत्वाच्या प्रांतांमध्ये कोरोना पसरू नये यासाठी, पीओके आणि गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये क्वारंटाइन सेंटर्स स्थापन केले आहेत. तसेच या भागांचे संपूर्ण नियंत्रण सैन्याकडे असल्याने येथील बातम्या बाहेरही जाऊ नयेत, असाही यामागचा उद्देश असू शकतो.
उपचारावेळी तरुण डॉक्टरचा मृत्यू -पाकिस्तानात कोरोनामुळे आतापर्यंत 7 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. यात गिलगिट- बाल्टिस्तानमधील एका तरुण डॉक्टरचाही समावेश आहे. डॉ. उसमा रियाज, असे या 26 वर्षीय डॉक्टरचे नाव आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांची तपासणी करताना त्याच्याकडे मास्क आणि ग्लोव्हज नव्हते. यामुळे त्याला कोरोनाचा संसर्ग झाला होता.
1.13 ट्रिलियनचे आर्थिक पॅकेज जाहीरकोरोना व्हायरसच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी पाकिस्तानने मंगळवारी तब्बल 1.13 ट्रिलियन (1 लाख 13 हजार कोटी) रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे. कोरोनाविरुद्ध लढा आणि अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी इमरान खान यांनी या निधीची घोषणा केली आहे.