नवी दिल्ली : देशात रविवारी कोरोनाचे १ लाख १४ हजार ४६० नवे रुग्ण आढळले. गेल्या दोन महिन्यांतील ही सर्वात कमी संख्या आहे. नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक आहे. तसेच ८ मे रोजी ३७ लाख सक्रिय रुग्ण होते. मात्र, आता सक्रिय रुग्णांची संख्या सुमारे १५ लाख आहे. म्हणजे महिनाभरात २२ लाख जण बरे झाले आहेत.
याआधी ५ एप्रिल रोजी कोरोनाचे ९६ हजार ९८२ नवे रुग्ण आढळून आले होते, तर हीच संख्या ६ एप्रिल रोजी १ लाख १५ हजार ७३६ होती. केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी १ लाख ८९ हजार २३२ जण बरे झाले तर २६६७ जणांचा मृत्यू झाला. देशात कोरोना रुग्णांची एकूण संख्या २ कोटी ८८ लाख ९ हजार ३३९ आहे व त्यातील २ कोटी ६९ लाख ८४ हजार ७८१ जण बरे झाले.
कोरोना संसर्गाने बळी गेलेल्यांची एकूण संख्या ३ लाख ४६ हजार ७५९ झाली आहे. बरे होणाऱ्यांचे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत ९३.६७ टक्के आहे तर दर आठवड्यातील संसर्गाचे प्रमाण ६.५४ टक्के आहे. देशात आजवर कोरोना लसीचे २३ कोटी १३ लाख २२ हजार ४१७ डोस देण्यात आले.
गेल्या चोवीस तासांत कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये ६ हजारांनी तर मृतांच्या संख्येत ७००ने घट झाली आहे. महाराष्ट्रामध्ये एकूण मृतांचा आकडा १ लाखाकडे गेला आहे. त्यापैकी २५ हजार रुग्ण एकट्या मे महिन्यात मरण पावले.देशात आतापर्यंत ३६ कोटी ४७ लाख ४६ हजार ५२२ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेने दिली.
चीनमध्ये तीन वर्षे वयाच्या मुलांसाठीही लस चीनने तीन वर्षे वयाच्या मुलांनाही देता येईल, अशी कोरोना लस शोधून काढली आहे. सिनोव्हॅक या कंपनीने तयार केलेल्या या कोरोना लसीच्या आपत्कालीन वापराला मान्यता देण्यात आली. मात्र, ही लस लहान मुलांना कधीपासून देणार हे चीनने जाहीर केलेले नाही. त्याआधी जगभरात आजवर १८ वर्षे व त्यापुढील वयाच्या लोकांसाठीच कोरोना लस देण्यात येत होती. अमेरिकेमध्ये १२ ते १५ वर्षे वयाच्या मुलांना कोरोना लस देण्यात सुरुवात झाली आहे, तर भारतासह काही देशांत २ वर्षे ते १७ वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी कोरोना लसीच्या चाचण्या सुरू आहेत.