नवी दिल्ली - देशामध्ये कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 92 लाखांचा टप्पा पार केला आहे. वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी आणि डॉक्टर्स अहोरात्र कोरोनाग्रस्तांची सेवा करत आहेत. आपल्या कुटुंबीयांपासून दूर राहून ते या संकटात आपलं कर्तव्य पार पाडत आहेत. याच दरम्यान अनेक कोरोना वॉरियर्सना देखील लागण झाली आहे. काहींनी व्हायरसवर यशस्वीरित्या मात केली आहेत. तर काहींना आपला जीव गमवावा लागला आहे. अशीच एक घटना मध्य प्रदेशमध्ये घडली आहे. अनेक रुग्णांचा जीव वाचवणाऱ्या एका कोरोना वॉरिअरचा मृत्यू झाला आहे.
कोरोनाच्या संकटात रुग्णांसाठी सदैव तत्पर असणाऱ्या, धडपडणाऱ्या 26 वर्षीय डॉक्टरला आपला जीव गमवावा लागला आहे. मध्य प्रदेशमधील डॉ. शुभम उपाध्याय (Dr. Shubham Kumar Upadhyay) याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करता करता त्यांनाही कोरोनाची लागण झाली. भोपाळच्या चिरायू रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र याच दरम्यान त्यांची प्रकृती ही अधिक बिघडली. तसेच याच दरम्यान मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी देखील ट्वीट करून शोक व्यक्त केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत ट्विट केलं आहे. "मनाला खूप वेदना होत आहेत, खूप दुःख होत आहे. आमचा निर्भीड कोरोना योद्धा डॉ. शुभम कुमार उपाध्याय, जे निःस्वार्थ वृत्तीने अहोरात्र सेवा करून कोरोना रुग्णांनी सेवा करताना संक्रमित झाले. त्यांनी आज आपले प्राण गमावले आहे" असं म्हटलं आहे.
"डॉक्टर होताना जी शपथ दिली जाते, त्यातील प्रत्येक शब्द डॉ. शुभम यांनी सार्थकी लावला. देशाचा एक खरा नागरिक असल्याचं देखील त्यांनी दाखवून दिलं आहे. भारतमातेच्या असा सुपुत्राला मी श्रद्धांजली अर्पण करतो. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो. मला आणि संपूर्ण मध्य प्रदेशला डॉ. शुभम यांचा अभिमान आहे. आम्ही त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहोत. मी आणि मध्य प्रदेश सरकार डॉ. शुभम उपाध्याय यांच्या कुटुंबासोबत आहोत" असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.