मुंबई - कोरोनाविरुद्ध गेल्या २ महिन्यांपासून भारतीयांची लढाई सुरु असून १ महिन्यापासून देशात लॉकडाऊन आहे. नागरिकांना घरातच बसण्याचे आवाहन पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी केले आहे. मात्र, अत्यावश्यक सेवांसाठी काही वेळेची सवलत नागरिकांना देण्यात आली आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत देशातील प्रत्येक नागरिक आपलं योगदान दे आहे. मात्र, डॉक्टर्स, नर्स, सफाई कर्मचारी आणि पोलीस प्रशासना रात्रंदिवस राबताना दिसत आहे. लॉकडाऊनचा सर्वाधिक ताण पोलिसांवर पडला आहे. अरुणाचल प्रदेशच्या पोलीस उप महानिरीक्षकांनी एक फोटो शेअर करत, देशातील पोलिसांच्या योगदानबद्दल एका ओळीत सगळंच सांगतिलंय.
कोरोना विषाणूंच्या संसर्गाने भारत आणि संपूर्ण जगभरात थैमान घातले असून, देशात शनिवारी या आजाराच्या रुग्णांची संख्या 25 हजारांच्या घरात गेली आहेत. जगात कोरोनामुळे मरण पावलेल्यांचा आकडा २ लाखांपर्यंत गेला आहेत. देशात कोरोनाबाधितांचा आकडा २६ हजार २६७ वर गेला असून, त्यापैकी ७ हजारांहून अधिक रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहेत. दिल्ली, गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेशातही रुग्णांची संख्या प्रत्येकी २ हजारांच्या वर गेला आहे. आतापर्यंत देशात कोरोनामुळे ८२५ जण मृत्युमुखी पडले आहेत. त्यामुळे हॉटस्पॉट असलेल्या आणि कोरोनाग्रस्तांची संख्या अधिक असलेल्या भागात ३ मे नंतरही लॉकडाऊन वाढण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्या २७ मे रोजी सर्वच राज्यांच्या प्रमुखांची बैठक बोलावली आहे. त्यामध्ये याबाबतीच चर्चा होईल. लॉकडाऊन होणार की नाही, याकडे देशाचे लक्ष लागले आहे. त्यातच, पोलीस प्रशासनाला मोठ्या संकटांना सामोरे जावे लागत आहे. कुटुंबापासून दूर रहावे लागत असून रात्रं-दिवस आपल्या कर्तव्यावर जावे लागत आहे. कोरोनामुळे सर्वकाही बंद आहे. तरीही, मिळेत ते खाऊन आपली ड्युटी पोलीस यंत्रणा करत आहे. त्यातच, कोरोनाग्रस्तांची वाढलेली संख्या ही पोलीस कुटुंबीयांच्या काळजीचा विषय बनला आहे. मात्र, ड्युटी फर्स्ट म्हणत कोरोनाच्या लढाईत देशातील पोलीस यंत्रणा आपलं योगदान देत आहे.
अरुणाचल प्रदेशचे पोलीस उप-महानिरीक्षक मधुर वर्मा यांनी रात्री चक्क रस्त्यावरच झोपलेल्या पोलिसांचा फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये, दोन पोलीस हवालदार चक्क जमिनीवरच झोपल्याचे दिसून येते. “चांगला बेड आणि आठ तासाची झोप ही काय चैनीच्या गोष्टी आहेत का? हो आहेत जर तुम्ही पोलीस असाल तर… अभिमान आहे मला यांचा”, या कॅप्शनसहीत वर्मा यांनी हा फोटो शेअर केला आहे. त्यांनी करोना योद्धे हा हॅशटॅगही ट्विटरवर वापरला आहे. वर्मा यांनी शेअर केलेला हा फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.