देशात कोरोनाचा प्रचंड कहर, जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा खरा ठरणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2020 06:56 AM2020-06-07T06:56:28+5:302020-06-07T06:57:04+5:30
दिवसात २९४ बळी । एकूण रुग्ण २.३६ लाखांवर; जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा खरा ठरणार?
नवी दिल्ली : देशामध्ये कोरोना साथीने माजविलेला हाहाकार कमी होण्याची चिन्हे नाहीत. या आजाराने शुक्रवारी २९४ जणांचा बळी घेतला. याआधी देशात एकाच दिवसात इतक्या मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण मरण पावले नव्हते. कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या आता २ लाख ३६ हजारांहून अधिक झाली आहे. एकाच दिवसात सुमारे १० हजार रुग्ण वाढल्याचा हा परिणाम आहे.
देशात १ लाख १५ हजार ९४२ कोरोना रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत, तर १ लाख १४ हजार ७२ रुग्ण उपचारानंतर पूर्णपणे बरे झाले आहेत. गेल्या सलग तीन दिवसांत भारतामध्ये कोरोनाचे ९ हजारांहून अधिक नवे रुग्ण सापडले आहेत. या साथीमध्ये आतापर्यंत बळी गेलेल्यांची संख्या ६ हजारांपेक्षा अधिक झाली आहे. कोरोनाची साथ देशामध्ये जून किंवा जुलै महिन्यात कळस गाठण्याची शक्यता आहे. याचा अर्थ तोपर्यंत या साथीचा खूप फैलाव होऊन बळींची संख्याही कदाचित बरीच वाढलेली असेल. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या ८० हजारांपेक्षा जास्त झाली आहे. सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. त्यानंतर तामिळनाडूमध्ये २८ हजारांपेक्षा अधिक, तर दिल्लीमध्ये २६ हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आहेत. गुजरातमध्ये १९ हजारांहून अधिक रुग्ण आहेत.
भारतात मृत्यूदर २.८%
चीनमध्ये कोरोनाच्या बळींची एकूण संख्या ४ हजारांपेक्षा अधिक आहे. यापेक्षा भारतात जास्त बळी गेले आहेत. चीनमध्ये कोरोनाचे ८४ हजार रुग्ण होते. एकट्या महाराष्ट्रात रुग्णांची संख्या आताच ८० हजारांवर गेली आहे. जगभरात सुमारे ६८ लाख लोकांना कोरोनाची लागण झाली असून, ३ लाख ९८ हजारांहून अधिक लोक मरण पावले आहेत. या आजारापायी जगभरात ५.८ टक्के इतका मृत्यूदर असताना भारतात मात्र त्याचे प्रमाण २.८ टक्के च आहे. भारतामध्ये गेल्या आठवडाभरात कोरोनामुळे दररोज सरासरी २३९ जणांचा मृत्यू झाला. त्याआधीच्या आठवडाभरात देशात कोरोनामुळे दररोज सरासरी १७९ जणांचा मृत्यू झाला होता.
भारत सहाव्या स्थानी
जगभरात सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या देशांत अकराव्या व नंतर नवव्या स्थानी असलेला भारत गुरुवारी सातव्या स्थानी होता; पण रुग्णवाढीमुळे भारत इटलीच्या पुढे म्हणजे सहाव्या स्थानी आला आहे. इटलीमध्ये रुग्णांची एकूण संख्या २ लाख ३४ हजार होती. भारतामध्ये २ लाख ३६ हजारांहून अधिक रुग्ण आहेत.
निर्बंध उठल्यास रुग्णवाढ होईल?
कोरोना साथीवर नियंत्रण मिळविण्यासाठी भारताने तातडीने लॉकडाऊन पुकारल्यामुळे व त्याची कडक अंमलबजावणी केल्यानेच फार मोठी हानी झाली नाही असे मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. मात्र, निर्बंध उठविल्यास रुग्णांची संख्या अधिक वाढण्याची भीती आहे. जागतिक आरोग्य संघटनेने तसा इशाराच दिला आहे. सोमवारपासून देशात व राज्यात अनेक निर्बंध रद्द होणार आहेत.
कोरोनावर उपचारासाठी ‘रेमडेसिवीर’ची मात्रा!
कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर उपचारासाठी ‘रेमडेसिवीर’ची मात्रा लागू पडत असल्याने राज्य सरकार बांगलादेशकडून या ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शनच्या १० हजार व्हॉयल्स खरेदी करणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी टिष्ट्वटरवर दिली आहे. ‘रेमडेसिवीर’ हे इंजेक्शन अॅण्टी व्हायरल असून ‘सार्स’ आजारासाठी ते उपयुक्त ठरल्याने कोरोनावरही ते उपयुक्त ठरू शकते, असे जागतिक आरोग्य संघटनेने सुचविले आहे. तसेच हे औषध कोरोना रुग्णांसाठी संजीवनी ठरत असल्याचा दावा अमेरिकेनेही केला आहे.
टॉपची राज्ये
महाराष्ट्र
82968
30152
तामिळनाडू
27654
दिल्ली