नवी दिल्ली : १ मेपासून सुरू होणाऱ्या लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याकरिता १८ ते ४५ वर्षे वयोगटातील लोकांनी बुधवारी संध्याकाळी ४ वाजतापासून आपली नावनोंदणी सुरू केल्यानंतर काही वेळातच को-विन, आरोग्य सेतू हे दोन्ही अॅप सर्व्हरच्या तांत्रिक बिघाडामुळे बंद पडले. त्यामुळे अनेकांचा मोठा खोळंबा झाला.
नावनोंदणीच्या वेळी को-विन व आरोग्य सेतू या दोन्ही अॅप बंद पडल्याने अनेक लोकांनी नाराजी व्यक्त केली. या अॅपवर नावनोंदणी करण्यासाठी काही तास तिष्ठत बसावे लागले तरीही नावनोंदणीचे काम काही झालेच नाही, अशी प्रतिक्रिया शेकडो लोकांनी समाजमाध्यमांवर व्यक्त केली. लसीकरण हे अत्यंत महत्त्वाचे असल्याने त्याच्याशी संबंधित अॅपसारख्या गोष्टी अद्ययावत ठेवायला हव्या होत्या. पण त्यामध्ये केंद्र सरकार कमी पडले, अशी टीका काही जणांनी ट्विटद्वारे केली. को-विन अॅप पुन्हा कार्यरत झाले आहे. लसीकरणासाठी १८ ते ४५ वर्षे वयोगटातील ७५ लाख जणांनी बुधवारी को-विन अॅपवर नावनोंदणी केली.
१५ मेनंतरच पुरवठा
लसीचा अनेक राज्यात तुटवडा आहे. त्यामुळे १ मेपासून लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला प्रारंभ होऊ शकेल की नाही, याविषयी शंकाच आहे. लसीचा पुरेसा पुरवठा १५ मेनंतरच करणे शक्य होईल, असे लस उत्पादक कंपन्यांनी कळविले आहे.