बरेली: देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली असली, तरी दिलासादायक बाब म्हणजे कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्याही वाढताना दिसत आहे. परंतु, कोरोना मृत्यूचे वाढणारे प्रमाण चिंताजनक आहे. कोरोनाच्या उद्रेकामुळे ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, बेड्स, कोरोना लसींचा तुडवडा अद्यापही जाणवत आहे. मात्र, उत्तर प्रदेशात एक वेगळाच प्रकार उघडकीस आला आहे. बरेली येथील आरोग्य विभागात तारीख उलटून गेलेल्या म्हणजेच ‘आऊट ऑफ डेट’ अँटिजन किटने तब्बल १० हजार कोरोना चाचण्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. (coronavirus 10 thousand people was done with the waste kit in bareilly uttar pradesh)
उत्तर प्रदेशमधील बरेली येथे हा प्रकार उघडकीस आला आहे. तारीख उलटून गेलेल्या अँटिजन किटने केलेल्या १० हजार कोरोना चाचण्यांपैकी बहुतांश अहवाल निगेटिव्ह असल्याचे सांगितले जात आहे. यातील अनेकांचा शोध घेऊन त्यांची आरटी-पीसीआर चाचणी करण्यात आली आहे. मात्र, ऑऊट ऑफ डेट झालेल्या किटने चाचण्या केलेल्या सर्व नागरिकांची ओळख पटलेली नाही. या प्रकरणी आरोग्य विभागातील अधिकारी काहीच बोलायला तयार नाहीत, असे सांगितले जात आहे.
सदोष किटचा पुरवठा
उत्तर प्रदेशतील काही ठिकाणी सदोष किटचा पुरवठा केल्याचे लक्षात आल्यावर याबाबत मुख्यमंत्री कार्यालायाशी संपर्क साधण्यात आला. तेव्हा मुख्यमंत्री कार्यालयाने आरटी-पीसीआर चाचण्यावर भर देण्याची सूचना केली. मात्र, सदोष अँटिजन किटचा वापर करायचा की नाही, यासंदर्भात कोणतेच निर्देश दिले नाहीत, अशी माहिती मिळाली आहे. सदोष किटने चाचण्या केलेल्या हजारो जणांना निगेटिव्ह असल्याचा अहवाल देऊन सोडण्यात आले. मात्र, त्यातील बहुतांश जणांना कोरोनाची लागण झालेली असू शकते, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
“पंतप्रधान मोदी, आतातरी जागे व्हा”; सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पावरून केंद्रावर टीका
कोरोनाबाधितांची संख्या घटली
सदोष अँटिजन किटमुळे हजारो लोकांचा अहवाल निगेटिव्ह दाखवल्यामुळे कोरोनाबाधितांच्या संख्येत घट आल्याचे दिसून आले आहे. या प्रकारामुळे १८ ते २० टक्के कोरोनाबाधित घटल्याचे सांगितले जात आहे. काही आकड्यांमुळे उत्तर प्रदेशात गोंधळाचे वातावरण असल्याचे दिसून येत आहे. या चाचण्यांमुळे खरा अहवाल मिळाला असता, तर चित्र आणखी वेगळे असते, असे म्हटले जात आहे.
दरम्यान, देशात गेल्या २४ तासात ३ लाख ४३ हजार १४४ नवीन रुग्ण आढळले. तर, ३ लाख ४४ हजार ७७६ रुग्णांनी करोनावर मात केली. आतापर्यंत दोन कोटीपेक्षा जास्त रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे सक्रिय प्रकरणांमध्ये घट झाल्याचे चित्र आहे. सध्या देशात ३७,०४,८९३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशात पॉझिटीव्हीटी रेट १८.२९ टक्के आहे. गेल्या २४ तासांत १८.७५ लाख चाचण्या घेण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर, आतापर्यंत १७,९२,९८,५८४ नागरीकांना करोना लसीचा डोस देण्यात आल्या आहे.