Coronavirus: पीएम केअर फंडात २.५१ लाख दिले; पण आईला बेड मिळवू शकलो नाही, अहमदाबादच्या विजय पारेख यांनी सांगितली व्यथा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 06:04 AM2021-05-26T06:04:08+5:302021-05-26T06:05:54+5:30
PM Care Fund: पीएम केअर फंडात २.५१ लाख रुपये जमा केलेल्या विजय पारेख यांना त्यांच्या मरणाच्या दारात असलेल्या कोरोनाबाधित आईसाठी धावपळ करूनही बेड मिळाला नाही. त्यांनी ही व्यथा ट्विटरवर सांगितली आहे.
मुंबई : पीएम केअर फंडात २.५१ लाख रुपये जमा केलेल्या विजय पारेख यांना त्यांच्या मरणाच्या दारात असलेल्या कोरोनाबाधित आईसाठी धावपळ करूनही बेड मिळाला नाही. त्यांनी ही व्यथा ट्विटरवर सांगितली आहे.
कोरोनाची पहिली लाट आली आणि देशात पहिल्यांदाचा लॉकडाऊन लागू झाले. त्यामुळे गरीब आणि कामगार वर्गाचे फार हाल झाले. या संकटात मदतीचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. या आवाहनाला देशातून मोठा प्रतिसाद मिळाला. अब्जावधी रुपये पीएम केअर्स फंडात जमा झाले. अहमदाबादच्या विजय पारेख यांनी या फंडात २.५१ लाख रुपये जमा केले होते.
पारेख यांची आई कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बाधित झाली. तिच्यावर उपचार व्हावेत यासाठी इकडेतिकडे धावपळ करूनही पारेख यांना बेड मिळाला नाही. त्यामुळे, पारेख यांनी आपली शोकांतिका ट्विटर अकाउंटवर सांगितली. त्यांनी १० जुलै २०२० रोजी २.५१ लाख रुपये जमा केल्याची पावतीही शेअर केली आहे.
भावनिक ट्वीट
‘मी पीएम केअर फंडात २.५१ लाख रुपये जमा केले, पण मरणाच्या दारात असलेल्या माझ्या आईला बेड उपलब्ध झाला नाही. त्यामुळे, मला मार्गदर्शन करा की, तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन मी कुठे मदत करू, ज्यामुळे मला बेड मिळेल आणि मी कुणाला गमावणार नाही,’ असे भावनिक ट्वीट पारेख यांनी केले आहे.
पारेख यांचे हे ट्वीट खूप व्हायरल होत आहे. फक्त १२ तासांत १४ हजार लाइक्स आणि ६,२०० रिट्वीट झाले आहे. विशेष म्हणजे पारेख यांचे यापूर्वीचे ट्वीट पाहिल्यास ते भाजप समर्थक असल्याचे दिसते.