नवी दिल्ली : जगभरात सध्या कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. भारतातही काही संशयित कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळल्याचे सांगण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर गुरूवारी राज्यसभेत काँग्रेसचे खासदार गुलाम नबी आझाद यांनी कोरोना व्हायरससंबंधी मुद्दा उपस्थित केला. याला उत्तर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिले.
यावेळी कोरोना व्हायरससंबंधी सर्व प्रकरणावर लक्ष ठेवण्याचे काम केंद्र सरकारकडून सुरू आहे. देशात आतापर्यंत 29 जणांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे समोर आले आहे. विदेशातून आलेल्या लोकांना कोरोना व्हायरसचे संक्रमण झाले आहे, असे डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले.
डॉ. हर्षवर्धन म्हणाले, "देशात कोरोना व्हायरसचे 29 लोकांना संक्रमण झाल्याचे समोर आले आहे. केरळमधील तीन रुग्ण ठीक झाले आहेत. दिल्लीत एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळला, तो इटलीहून भारतात आला होता. पंतप्रधान कार्यालय यावर लक्ष ठेवून आहे. 4 मार्चपर्यंत 6,11,176 प्रवाशांची वेगवेगळ्या ठिकाणी तपासणी झाली आहे."
याचबरोबर, चीनमधील वुहानमधून भारतीयांना सुखरूप भारतात आणले आहे. वुहामधून आलेल्या भारतीयांची टेस्ट निगेटिव्ह आहे, असे डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले. तसेच, चीन, जपान, इटली या देशांत जाणाऱ्या लोकांचा व्हिसा रद्द करण्यात आला आहे. राज्यांच्या मदतीने मंत्रालयाने गाइडलाइन जारी केली आहे. कोरोना व्हायरससंबंधी चौकशी करण्यासाठी 19 आणखी लॅब तयार करण्यात येणार आहेत. याशिवाय, केंद्र सरकार जागतिक आरोग्य संघटनेच्या संपर्कात आहे, असे डॉ. हर्षवर्धन यांनी राज्यसभेत सांगितले.
देशात 18 जानेवारीपासून स्क्रीनिंग करण्यात येत आहे. चीन, जपान, हाँगकाँग, नेपाळ, व्हिएतनाम, सिंगापूर, थायलंड या देशांतून येणाऱ्या प्रवाशांची स्क्रीनिंग आधीपासूनच करण्यात येत होती. आता विदेशातून येणाऱ्या सर्वच प्रवाशांची स्क्रीनिंग करण्यात येत आहे. N95 मास्क आणि इतर उपकरणांच्या एक्सपोर्टवर नियंत्रण आणले आहे, असे डॉ. हर्षवर्धन म्हणाले.
याशिवाय, कोरोना व्हायरसच्या तपासणीसाठी 15 लॅब तयार करण्यात आल्या आहेत तर 19 तयार करण्यात येत आहेत. तसेच, एक कॉल सेंटर सुद्धा तयार करण्यात आले आहे, असेही डॉ. हर्षवर्धन यांनी राज्यसभेत सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
आता 'कोरोना'लाही विम्याचं कवच? कंपन्यांकडून तयारी सुरू
...तर 'अशा' कर्मचाऱ्यांना घरातून काम करु द्या; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारची सूचना
'भारताकडे कोरोना व्हायरसवर प्रतिबंधक लस शोधण्याची क्षमता'
कोरोना व्हायरस रोखण्यासाठी 'ही' भारतीय पद्धत वापरा; इस्त्रायलच्या पंतप्रधानांनी सांगितले कारण...