नवी दिल्ली : कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ दिसत असताना देशात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण २९ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. दिलासादायक बाब म्हणजे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सरासरी ७ टक्क्यांपेक्षा जास्त रुग्ण बरे होऊन घरी परतले. योग्य वेळी निदान व तात्काळ उपचाराचा हा परिणाम असल्याचे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले.
मात्र २४ तासांत ३५६१ रुग्ण समोर आल्याने कोरोनाचे आव्हान वाढले आहे. एकाच दिवसातील हा मोठा आकडा आहे. आयसीएमआरने देशातील चाचण्यांची संख्या वाढवली असली तरी लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात सूट दिल्याने लोक संपर्कात वाढ दिसून आली. वाढीव रुग्णसंख्येमागे हेही एक कारण असल्याचा दावा आरोग्य मंत्रालयातील सूत्रांनी केला. आतापर्यंत १३ लाख ५७ हजार ४१३ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.ब्रिटनमध्ये मृतांची संख्या ३० हजार : कोरोनाचा प्रकोप थांबण्याची लक्षणे अजिबात दिसत नसून, या आजाराने ब्रिटनमध्ये ३० हजार रुग्णांचा बळी घेतला आहे. अमेरिकेत आतापर्यंत सुमारे ७५ हजार मृत्युमुखी पडले आहेत. अमेरिकेखालोखाल ब्रिटनमध्ये मृतांचे प्रमाण अधिक आहे.