नवी दिल्ली : कोरोना विषाणूसंदर्भात चाचणीसाठी देशातील संशोधकांनी तीन स्वतंत्र संच तयार केले असून त्यातील दोन चाचणी संचांचे व्यावसायिक उत्पादन करण्यास इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) व सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनने (सीडीएससीओ) मान्यताही दिली आहे. तिसऱ्या संचाची आयसीएमआरकडून सध्या तपासणी सुरू आहे. त्यामुळे देशात लवकरच स्वदेशी बनावटीचे व स्वस्त किमतीतील कोरोना चाचणी संच मुबलक प्रमाणात उपलब्ध होतील.
स्टार्ट अप कंपन्यांना हे संच तयार करण्यासाठी प्रोत्साहन देणाºया सेंटर फॉर सेल्युलर अँड मोलॅक्युलर प्लॅटफॉर्म या संस्थेने म्हटले आहे की, या संचाद्वारे करण्यात येणाºया कोरोना चाचणीला फक्त एक हजार रुपये खर्च येईल. भारतात दर १० लाख लोकांमध्ये सध्या ५०० लोकांच्याच कोरोना चाचण्या होताना दिसत आहेत. मात्र देशात दररोज कोरोनाविषयक १ लाख चाचण्या झाल्या पाहिजेत असे आयसीएमआरचे मत आहे. भारतात कोरोनाविषयक आरटी-पीसीआर चाचण्यांच्या ३५ लाख संचांची आवश्यकता असताना आपल्याकडे २१.३५ लाख संचच उपलब्ध आहेत. त्यातील २ लाख संच स्वदेशी बनावटीचे आहेत असे केंद्रीय औषधनिर्मिती खात्याचे सचिव पी. वाघेला यांनी सांगितले. अशा स्थितीत कोरोना चाचणीचे संच मोठ्या प्रमाणावर बनविण्याची देशातील उद्योजकांना सुवर्णसंधी मिळाली आहे.दोन ते अडीच तासांत चाचणीचे निष्कर्ष हातीदेशामध्ये कोरोना चाचणी संचाचे उत्पादन करण्यासाठी सीडीएससीओने सर्वप्रथम वडोदरातील कोसारा डायग्नोस्टिक या स्वदेशी कंपनीला मार्चमध्ये परवानगी दिली होती. हे संच आता बाजारपेठेत लवकरच उपलब्ध होणार आहे. या संचाद्वारे केलेल्या चाचणीनंतर अवघ्या अडीच तासात निष्कर्ष हाती येतात. असे दररोज वीस हजार संच तयार करण्याची या कंपनीची क्षमता आहे. कोरोना चाचणीचा असाच एक संच हैदराबाद येथील हुवेल लाईफसायन्सेस या कंपनीने बनविला आहे . त्यांच्या संचाने केलेल्या चाचणीचे निष्कर्ष अवघ्या दोन तासांत हाती येतात. जैवतंत्रज्ञान विभागाने दिलेल्या आर्थिक पाठबळामुळे या कंपनीने कोरोना चाचणीसाठी १० हजार संच तयार करून ते तेलंगणात वितरितही केले. त्यांच्याकडे आणखी काही जणांनी या संचांची मागणी नोंदविली आहे. कोरोना चाचणीचा तिसरा संच नॉयडातील डीएनए एक्सपर्टस या कंपनीने बनविला असून त्याची आयसीएमआरकडून तपासणी सुरू आहे.