नवी दिल्ली: कोरोना व्हायरसने चीन, युरोप, इटलीसह जगभरातील अनेक देशांमध्ये थैमान घातले आहे. भारतामध्ये देखील कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून आज नोएडातील दोन रुग्णांना कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे भारतातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 134वर पोहचला आहे. कर्नाटकातील कलबुर्गी येथील 76 वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची पहिली घटना देशात घडली होती. मात्र आता या कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरला देखील कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले आहे.
कोरोनामुळे 12 मार्चला कर्नाटकात 76 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला होता. या रुग्णाच्या मृत्यूनंतर भारतात कोरोनामुळे झालेल्या पहिल्या मृत्यूची नोंद झाली होती. मात्र आता या रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्टरला देखील कोरोनाची लागण झाली आहे. यानंतर त्यांना कुंटुंबासोबत घरात बंदिस्त ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाची लागण झालेल्या डॉक्टरला लवकरच विलगीकरण कक्षात ठेवलं जाणार असल्याची माहिती कलबुर्गीचे उपायुक्त शरत बी यांनी दिली आहे.
कोनामुळे जगभरात आतापर्यत 7,000 हून अधिक लोकांचा बळी घेतला आहे. एकट्या चीनमध्येच कोरोनामुळे 3,100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर भारतात कोरोनामुळे 3 जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे भारतात कोरोनाबाधित 13 जण बरे झाले आहेत. भारतामध्ये देखील कोरोनाग्रस्तांची संख्या आता 134 वर पोहोचली आहे.
मुंबईत महाराष्ट्रातील पहिला बळी
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मुंबईत 64 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. कस्तुरबा रुग्णालयात दाखल असलेल्या 64 वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून मिळाली आहे. हिंदुजामधील या रुग्णाला कोरोनाची लागण झाल्यानंतर कस्तुरबा रुग्णालयात दाखल केले होते, या रुग्णाला उच्च रक्तदाब, मधुमेह यांसारख्या अन्य समस्याही होत्या. देशातील कोरोनाबाधित रुग्णाचा हा तिसरा बळी आहे. तसेच महाराष्ट्रातील कोरोनाची लागण होऊन दगावलेला हा पहिला रुग्ण आहे.