CoronaVirus : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ७५ पोलिसांचे मुंडण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2020 12:42 PM2020-04-06T12:42:59+5:302020-04-06T12:43:22+5:30
CoronaVirus : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आग्रा येथील फतेपूर सिक्री पोलीस ठाण्यातील पोलिसांनी एक अनोखी शक्कल लढविली आहे.
आग्रा - देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन सुरु आहे. तसेच, या संकटाचा सामना करण्यासाठी सरकारकडून अनेक प्रयत्न सुरु आहेत. यातच कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आग्रा येथील फतेपूर सिक्री पोलीस ठाण्यातील पोलिसांनी एक अनोखी शक्कल लढविली आहे.
रविवारी फतेपूर सिक्री पोलीस ठाण्याच्या निरीक्षकासह एकूण ७५ पोलिसांनी सामूहिक मुंडण केले. त्यानंतर या पोलिसांनी शहरात गस्त घातली. यावेळी लॉकडाऊनमुळे घरात असलेल्या लोकांनी घराच्या खिडक्यांमधून मुंडण केलेल्या पोलिसांना पाहिले आणि त्यांना आश्चर्य वाटले.
फतेपूर सिक्री ठाण्याचे प्रभारी निरीक्षक भुपेंद्रसिंह बालियान यांनी सांगितले की, "काही लोक तोंडाला मास्क लावतात आणि डोकेही झाकतात, हे आम्ही पाहिले आहे पाहिले आहे. मात्र, कोरोना व्हायरस डोक्याच्या केसांना देखील चिकटू शकतो. तेथून तो श्वासावाटे शरीरात जाऊ शकतो, असे डॉक्टरांनी म्हटले आहे. त्यामुळे आम्ही हे लक्षात घेऊन मुंडण करण्याचा निर्णय घेतला." याचबरोबर, मुंडण करण्याच्या निर्णयाला संपूर्ण पोलीस ठाण्याची सहमती होती. यामध्ये एकूण ७५ पोलिसांनी मुंडण केले. हे मुंडण करताना सोशल डिस्टंसिंग पाळण्यात आले, असेही भुपेंद्रसिंह बालियान यांनी सांगितले.
मुंडण करणाऱ्या पोलिसांमध्ये प्रभारी निरीक्षकाव्यतिरिक्त निरीक्षक (गुन्हे) अमित कुमार, नऊ उपनिरीक्षक, १५ मुख्य हवालदार आणि ४९ हवालदारांचा समावेश आहे. तसेच, मुंडण करणे हे पोलिसांच्या प्रोटोकॉलचे उल्लंघन नाही, असे पोलीस निरीक्षकांचे म्हणणे आहे. लांब केस राखणे हे प्रोटोकॉलचे उल्लंघन आहे. मात्र केस छोटे किंवा मुंडण केल्यामुळे प्रोटोकॉल मोडला जात नाही, असेही पोलिसांचे म्हणणे आहे.
दरम्यान, भारतात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचा संख्या वाढत चालली आहे. सोमवारी आरोग्य मंत्रालयाकडून दिलेल्या माहितीनुसार देशात कोरोनाच्या रुग्णांचा संख्या ४ हजारहून अधिक झाली आहे. भारतात कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत १०९ लोकांचा मृत्यू झाला असून ४०६७ लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर २३२ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. गेल्या २४ तासांत ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६९३ कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत.