हरिद्वार: दुसऱ्या लाटेनंतर देशातील कोरोनाची परिस्थिती भयावह आणि भीतीदायक होत चालली आहे. कोरोनाबाधितांची संख्या नवनवे उच्चांक गाठत असताना, कोरोना लस, रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन, बेड्स यांची मोठ्या प्रमाणावर टंचाई जाणवत आहे. यातच आता योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली योगपीठातील ८३ जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे. योगपीठात इतक्या मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. (83 people tested corona positive in patanjali yogpeeth of baba ramdev)
बाबा रामदेव यांच्या पतंजली योगपीठात कोरोनाची लागण झालेल्या सर्व ८३ जणांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. यानंतर बाबा रामदेव यांचीही कोरोना चाचणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच अन्य लोकांचीही कोरोना चाचणी केली जाण्यार असल्याचे समजते. हरिद्वारचे सीएमओ डॉक्टर शंभू झा यांनी यासंदर्भातील माहिती दिली.
ऑक्सिजन खूप कमी आहे, रुग्ण वाचणार नाहीत; रुग्णालयाच्या CEO ना अश्रू अनावर
योगपीठाच्या परिसरातच सर्वांचे विलगीकरण
आतापर्यंत पतंजली योगपीठ आचार्यकुलम आणि योग ग्राममध्ये ८३ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. या सर्वांना योगपीठाच्या परिसरातच विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. गरज भासल्यास बाबा रामदेव यांचीही कोरोना चाचणी करण्यात येईल, असे डॉक्टर शंभू झा यांनी सांगितले. तसेच ऋषिकेशमधील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानमधील ओपीडी बंद करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे ओपीडी काही दिवसांसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
खोटे उत्सव, पोकळ भाषण नको, देशासाठी उपाययोजना करा; राहुल गांधींची मोदींवर टीका
दरम्यान, उत्तराखंडात आयोजित करण्यात कुंभमेळ्यात कोरोनाचा शिरकाव झाला होता. कुंभमेळ्यात सहभागी झालेल्या शेकडो साधू, संत, भाविकांना कोरोनाची लागण झाली होती. गेल्या काही दिवसांपासून उत्तराखंडमधील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यात निर्बंध लावण्यात आले असून, गुरुवारी १९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आताच्या घडीला उत्तराखंडात सुमारे २७ हजार रुग्ण कोरोनावर उपचार घेत असल्याची माहिती मिळाली आहे.