हैदराबाद - कोरोनाविरोधातील लढाईतील एकजूट दाखवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी (काल) रात्री ९ वाजता ९ मिनिटं दिवा, मेणबत्ती, टॉर्च पेटवण्याचं आवाहन केलं होतं. मोदींच्या या आवाहनाला देशानं उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. त्याचवेळी उत्तर प्रदेशातील बलरामपूरच्या भाजपा जिल्हाध्यक्ष मंजू तिवारींनी हवेत गोळीबार केला. मंजू तिवारींनी रात्री ९ वाजता दिवा लावल्यानंतर त्यांच्या परवाना असलेल्या बंदुकीतून काही राऊंड्स फायर केल्या. तर तेलंगणातील एकमवेव भाजपाआमदाराने सोशल डिस्टन्सिंगला हरताळ फासल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे दिव्यांऐवजी चक्क मशाली पेटवून या आमदार महाशयांनी एकतेचा संदेश दिलाय.
संपूर्ण देश कोरोनाविरोधातील संघर्षात एकजूट दाखवत असताना भाजपा महिला जिल्हाध्यक्ष मंजू तिवारी बंदुकीतून गोळीबार करत होत्या. विशेष म्हणजे त्यांनी स्वत: हा व्हिडीओ फेसबुकवर शेअर केला. 'दिवा पेटवल्यानंतर कोरोनाला पळवताना' असं शीर्षक त्यांनी व्हिडीओला दिलं. त्यानंतर तो व्हायरल झाला. यामध्ये त्या बंदुकीतून गोळीबार करताना स्पष्ट दिसत आहेत. आनंदाच्या भरात गोळीबार करणं हा कायद्यानं गुन्हा आहे. त्यामुळे आता मंजू तिवारी यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे हैदराबादच्या गोशामहल मतदारसंघातील आमदार आणि भाजपा नेते टी राजासिंग यांनी चक्क हाती मशाली घेऊन टेंबा पेटवल्याप्रमाणे कोरोनाविरुद्धच्या मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. यावेळी, गो कोरोना गो... असे म्हणत त्यांच्या समर्थकांनी केंद्रीयमंत्री रामदास आठवलेंचं अनुकरण केल्याचं पाहायला मिळालं.
टी राजा सिंग यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह एकत्र येत मशाली पेटवल्या, हाती मशाली घेऊन एकप्रकारे प्रदर्शनच केलं. यावेळी, सोशल डिस्टन्सिंग जपण्याचं भान त्यांना राहिल नाही. सध्या ट्विटर आणि इतर सोशल मीडियावर राजासिंग यांचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तसेच, भाजपा आमदाराकडूनच नियमांचे उल्लंघन होत असल्याची टीका त्यांच्यावर करण्यात येत आहे. तसेच, दिव्यांऐवजी मशाली पेटवल्यानेही त्यांना लक्ष्य करण्यात येत आहे.