लखनौ - कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. तसेच या लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंग कठोर अंमलबाजवणी करवून घेण्यात येत आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याबाबत वारंवार बजावत असताना भाजपचे नेतेच लॉकडाऊनचा फज्जा उडवत असल्याचे दिसून येत आहे. देशात कोरोनाबधितांची संख्या सातत्याने वाढत असताना उत्तर प्रदेशमध्ये मात्र भाजपच्या स्थानिक नेत्यांनी चक्क क्रिकेट सामन्याचे आयोजन केल्याचे उघड झाले आहे.
देशात लॉकडाऊन सुरू असले तरी विविध कारणांमुळे लोकांकडून लॉकडाऊनचे वारंवार उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशमधील बराबंकी येथील पानापूर येथे भाजपच्या एका स्थानिक नेत्याने लॉकडाऊनचे उल्लंघन करून क्रिकेट सामन्याचे आयोजन केले. या सामन्यात चौकार- षटकारांची आतषबाजी झाली. तसेच हा सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांनीही मोठ्या प्रमाणावर गर्दी केली.
मात्र या क्रिकेट सामन्याचे आयोजन करणे भाजपच्या नेत्यांना महागात पडले आहे. पोलिसांनी त्यांच्या विरुद्ध जागतिक साथरोग प्रतिबंधक अधिनियम कलम 188 सह अन्य काही कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी दीपक सिंह, सुधीर सिंह, जालीम सिंह यांच्यासह 9 ज्ञात आणि 20 आज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.