नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. भारतात सुद्धा कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढत होत आहे. कोरोनामुळे देशातील स्थिती चिंताजनक आहे. यावर मात करण्यासाठी देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन सुरू आहे. आतापर्यंत देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 5149 वर पोहचली आहे. तर 149 लोकांचा मृत्यू झाला आहे. याच दरम्यान जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्यात आली आहेत. मात्र इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे देशातील तळीरामांची अडचण झाली आहे. दारुची दुकानं बंद असल्यामुळे पाच जणांनी आत्महत्या केल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता दुधाच्या कॅनमधून दारुच्या बाटल्या नेल्या जात असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
लॉकडाऊनमुळे दारुची दुकानं बंद आहेत. मात्र याच दरम्यान दारुच्या बाटल्यांचा सप्लाय करण्यासाठी शक्कल लढवली जात आहे. अशीच एक घटना दिल्लीमध्ये घडली आहे. दुधाच्या कॅनमधून एक तरुण दारुच्या बाटल्या नेत होता. मात्र त्याचा हा प्रयत्न फसला आणि तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे. तसेच दुधाच्या चार कॅनमधील दारुच्या सात बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बॉबी चौधरी असं अटक केलेल्या तरुणाचं नाव असून तो बुलंदशहरचा रहिवासी आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना रात्री साडे बाराच्या सुमारास एक तरुण बाईकवरून दुधाचे कॅन घेऊन जात असल्याचं दिसलं. रात्रीच्या वेळी कॅन पाहून पोलिसांना संशय आला. शंका आल्यावर पोलिसांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने आपल्या गाडीचा वेग वाढवून पळून जाण्याचा प्रयत्न केला. अखेर त्याचा पाठलाग करुन पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याजवळील दुधाच्या चार कॅनमधून दारुच्या सात बाटल्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. तसेच त्याची बाईकही ताब्यात घेण्यात आली आहे. तरुणाने गुरुग्राम येथून दारू विकत घेतली पण परत जाताना रस्ता चुकल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, भारतात कोरोनाचा संसर्ग एकूण 5149 लोकांना झाला आहे. तर यामुळे 149 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच, देशातील कोरोना बाधित 402 रुग्ण बरे झाले आहेत. याशिवाय, गेल्या 24 तासांत देशात 773 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. तर 35 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे. महाराष्ट्रात एक हजारहून अधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. महाराष्ट्रात बुधवारी 60 नवे रुग्ण आढळले असून आतापर्यंत 1078 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यामध्ये फक्त मुंबईत आज 44 नवे रुग्ण सापडले आहेत. तर, पुण्यात 9, नागपूरमध्ये 4 आणि अहमदनगर, अकोला व बुलढाणा येथे प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. दरम्यान, कोरोनावर मात करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारडून विविध उपाययोजना सुरू आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus : देशात कोरोनाग्रस्तांची संख्या ५१४९वर पोहोचली, १४९ जणांचा मृत्यू
CoronaVirus: 14 एप्रिलला लॉकडाऊन संपणार; १५ पासून देशात काय काय बदलणार?