नवी दिल्ली: कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार अनेक उपाय योजना करत आहेत. याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकारने 'आरोग्य सेतु ' हे अॅप विकसित केले आहे. या अॅपद्वारे कोरोना आजाराबद्दल माहिती मिळणार आहे. याच बरोबर आपल्या परिसरात असलेले कोरोना रूग्ण आणि संशयितांची माहितीही हे अॅप वापरणाऱ्यांना मिळणार आहे, असे केंद्र सरकारने सुचित केले आहे. मात्र दिल्लीतआरोग्य सेतुच्या अॅपवरुन नवा वाद निर्माण झाला आहे.
नोएडातील गौतमबुद्धनगर जिल्ह्यात आरोग्य सेतु अॅपची नागरिकांवर सक्ती करण्यात आली आहे. तसेच या अॅपशिवाय बाहेर पडताना नागरिक आढळल्यास त्याला तुरुंगवासाची शिक्षाही होऊ शकते, असं सांगण्यात आले आहे. ३ मे रोजी सायंकाळी अतिरिक्त पोलीस उपायुक्त आशुतोष द्विवेदी यांनी लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यासाठी काही निर्देश जारी केले आहेत. यामध्ये आरोग्य सेतु अॅपच्या सक्तीबाबतही सांगण्यात आले आहे.
स्मार्टफोनमध्ये आरोग्य सेतू अॅप नसेल तर लॉकडाऊनच्या निर्देशांचं उल्लंघन मानून त्या नागरिकांवर कारवाई करण्यात येईल, असं अतिरिक्त पोलीस उपायुक्त आशुतोष द्विवेदी यांनी जाहीर केलेल्या निर्देशांत म्हटलंय. लॉकडाऊनच्या निर्देशांच्या उल्लंघनासाठी पोलीस कलम १८८ आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ च्या कलम ५१ ते ६० अंतर्गत कारवाई करत आहेत. यामध्ये दंडाशिवाय तुरुंगवासाच्या शिक्षेचीही तरतूद आहे.
दरम्यान, आरोग्य सेतू अॅपच्या माध्यमातून कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केलं जातं. आपण कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलो आहोत का, याची माहिती ब्लूटूथच्या माध्यमातून अॅप वापरणाऱ्या व्यक्तीला मिळते. कोरोनाबाधित व्यक्ती किती दूर आहे, याची माहिती यावर मिळते. कोरोनाची लागण झालेली व्यक्ती फार दूर असेल तर ग्रीन अलर्ट मिळतो. ती व्यक्ती मध्यम अंतरावर असल्यास ऑरेंज आणि अतिशय जवळ असल्यास रेड अलर्ट मिळतो.