कोलकाता : देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्यामुळे कोरोनावर मात करण्यासाठी देशात ३ मेपर्यंत लॉकडाऊन सुरु आहे. या लॉकडाऊन पोलिसांवर विविध भागात हल्ला करण्यात आल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. यातच आता पश्चिम बंगालमधील नॉर्थ २४ परगनामध्ये पोलिसांनर हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. याठिकाणी लॉकडाऊनमध्ये नागरिकांनी पोलिसांवर केलेली दगडफेक आणि हाणामारीमुळे वातावरण तापले आहे.
बुधवारी नॉर्थ २४ परगना येथील स्थानिक लोक रेशन मिळत नसल्यामुळे आंदोलन करत होते. यावेळी हे लोक लॉकडाऊनचे नियम मोडून रस्त्यावर आल्याने पोलिसांनी समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी पोलीस आणि स्थानिकांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर या बाचाबाचीचे वादात आणि हाणामारीत रुपांतर झाले.
पोलिसांनी रस्त्यावर आंदोलन करणाऱ्यांवर लाठीचार्ज करण्यास सुरुवात केली. त्यानंतर संतप्त स्थानिकांनी पोलिसांवर तुफान दगडफेक आणि लाठ्या-काठ्या घेऊन मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत चार पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.
घटनास्थळी एसडीपीओ दाखल झाले आहेत. तसेच, याठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांवर अशाप्रकारे हल्ला करणारी ही पहिलीच घटना नाही आहे. आजच उत्तर प्रदेशातील अलीगडमध्ये स्थानिक लोक आणि पोलीस यांच्यात हाणामारी झाली. यावेळी स्थानिकांनी लॉकडाऊनचे पालक करणाऱ्या पोलिसांवर दगडफेक केल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या १९ हजार ९८४ वर पोहचली आहे. तर ६४० जणांचा मृत्यू झाला आहे. १५ हजार ४७४ जणांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून ३८७० लोकांना उपचारानंतर घरी पाठण्यात आले आहे. तसेच गेल्या १५ तासांत देशभरात कोरोनामुळे ३७ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे तर १३८३ कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. मात्र दिलासा देणारी बाब म्हणजे ६१० जणांनी कोरोनाविरुद्धचा लढा यशस्वीपणे दिला असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच आता ३००० हून अधिक लोकांनी कोरोनावर मात करून ही लढाई जिंकली असल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले.