नवी दिल्लीः कोरोना विषाणूनं भारतात थैमान घातलं असून, बाधितांची संख्या वाढतच चालली आहे. देशात कोरोनाग्रस्तांची संख्या ५६०वर गेली असून, आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४६ जणांची या जीवघेण्या रोगातून सुखरूप मुक्तता झाली आहे. महाराष्ट्रातही कोरोनाग्रस्तांची संख्या १०७वर गेली असून, केरळमध्ये कोरोनानं बाधित झालेले १०५ रुग्ण समोर आले आहेत. विशेष म्हणजे या कोरोनाग्रस्तांमध्ये ४१ विदेशी नागरिकांचा समावेश आहे.कोरोनामुळे देशात बळी गेलेल्यांची संख्या आता ११ झाली आहे. त्यामध्ये महाराष्ट्र, बिहार, कर्नाटक, दिल्ली, गुजरात, पंजाब, हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगाल या राज्यांमधील मृतांचा समावेश आहे. देशभरात या विषाणूच्या साथीचा मोठ्या प्रमाणावर फैलाव होऊ नये म्हणून अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सारे व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. देशातील जवळपास सर्वच राज्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे आणि रेल्वे, हवाई तसेच रस्त्यावरील वाहतूक सध्या पूर्णत: बंद ठेवण्यात आली आहे.कर्नाटकमध्ये ३७, राजस्थानमध्ये ३३, उत्तर प्रदेशमध्ये ३३, तेलंगणामध्ये ३२, दिल्लीत ३१, गुजरातमध्ये २९, हरयाणात २९, पंजाबमध्ये २१ रुग्ण आढळले आहेत.लडाखमध्ये कोरोनाचे १३, तामिळनाडूत १२, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेशमध्ये प्रत्येकी ७, छत्तीसगढमध्ये ६, जम्मू-काश्मीरमध्ये ४, उत्तराखंड व हिमाचल प्रदेशमध्ये प्रत्येकी ३, बिहार, ओडिशामध्ये प्रत्येकी दोन, पुडुचेरी, छत्तीसगढमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला. देशात अनेक ठिकाणी संचारबंदी असतानाही अतिउत्साही लोक रस्त्यांवर दुचाकी, चारचाकी वाहनांतून फिरताना आढळून येत आहेत. कोणत्याही ठिकाणी गर्दी करू नका, असे सरकारने वारंवार आवाहन करूनही लोक ती गोष्ट गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. त्यामुळे जीवनाश्यक वस्तू, भाजीपाला यांच्या खरेदीसाठी लोक दुकाने, मंडयांमध्ये तोबा गर्दी करताना दिसत आहेत. यामुळे कोरोनाच्या फैलावाचा धोका आणखी वाढणार असल्याचा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. म्हणूनच केंद्र व राज्य सरकार लोकांना घरात राहण्याचे आवाहन करीत आहे.
Coronavirus : कोरोनानं भारतात ५६० लोक संक्रमित, ११ जणांनी गमावला जीव
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 9:04 AM