फक्त 15 हजार रुपयांसाठी अडीच महिने रुग्णालयातच पडून होता कोरोना बाधिताचा मृतदेह, आता झाले अंत्यसंस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2021 10:21 AM2021-07-02T10:21:10+5:302021-07-02T10:27:52+5:30
अडीच महिन्यांनंतरही मृतदेह घेण्यासाठी कुणीही न आल्याने मेरठ रुग्णालयाने तो मृतदेह हापूड आरोग्य विभागाकडे पाठवला. हापूड आरोग्य विभागाने हा मृतदेह तीन दिवस जीएस मेडिकल कॉलेजमध्ये ठेवला आणि प्रशासनाच्या मदतीने नातलगांचा शोध घ्यायला सुरुवात केली.
हापूड - उत्तर प्रदेशातील हापूड जिल्ह्यातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे केवळ 15 हजार रुपयांसाठी एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृतदेह तब्बल आडीच महिने रुग्णालयातच पडून होता. अखेर एनजीओच्या मदतीने त्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ही धक्कादायक घटना सिटी कोतवाली भागातील आहे. संबंधित मृत व्यक्तीला एप्रिल महिन्यात कोरोनाची लागण झाला होता. त्यांना उपचारासाठी मेरठ येथे रेफर करण्यात आले होते. येथेच उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. (CoronaVirus: Corona positive dead body cremated after two and half months in Hapur Uttar pradesh)
यानंतर, रुग्णालयाकडून मृत व्यक्तीच्या पत्नीकडे मृतदेह देण्यासाठी 15 हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र, मृत व्यक्तीच्या पत्नीकडे रुग्णालयाला देण्यासाठी पैसे नव्हते. पैशांची व्यवस्था करण्यासाठी त्या हापूड येथे आल्या होत्या. मात्र, येथेही पैशांची व्यवस्था न झाल्याने, त्या आपल्या दोन मुलांना घेऊन गावी निघून गेल्या. अशा प्रकारे मृतदेहाला रुग्णालयातच ठेवून अडीच महिने झाले.
CoronaVirus: वेगवान डेल्टा व्हेरिअंटचे जगभरात थैमान; WHO चा युरोपमध्ये तिसऱ्या लाटेचा इशारा
अखेर, अडीच महिन्यांनंतरही मृतदेह घेण्यासाठी कुणीही न आल्याने मेरठ रुग्णालयाने तो मृतदेह हापूड आरोग्य विभागाकडे पाठवला. हापूड आरोग्य विभागाने हा मृतदेह तीन दिवस जीएस मेडिकल कॉलेजमध्ये ठेवला आणि प्रशासनाच्या मदतीने नातलगांचा शोध घ्यायला सुरुवात केली. नातलगांचा शोध लागल्यानंतर हा मृतदेह त्यांच्या स्वाधीन करण्यात आला आणि एका एनजीओच्या माध्यमाने मृतदेहावर अत्यसंस्कार करण्यात आले.
यावर बोलताना हापूड सीएचसी प्रभारी डॉ. दिनेश खत्री म्हणाले, मेरेठ येथील रुग्णालयाकडून मृत व्यक्तीच्या भावाला ते (मृत व्यक्ती) कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र, त्यांचा भाऊ हे ऐकून तेथून पळून गेले होते. त्याने तेव्हापासून त्याचा मोबाईलदेखील स्विच ऑफ केला आहे. आता मृत व्यक्तीच्या घरमालकाचा आणि त्यांच्या पत्नीचा शोध घेऊन त्यांच्याकडे मृतदेह सोपविण्यात आला. एका एनजीओच्या सहाय्याने मृतदेहावर अंत्यसंस्कारही करण्यात आले आहेत.