नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या वेगाने होत असलेल्या फैलावामुळे जगासमोर गंभीर संकट निर्माण झाले आहे. भारतातही कोरोनाच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. कोरोनाचे निदान करण्यासाठी आणि त्यावर उपाय शोधण्यासाठी जगभरात युद्धपातळीवर संशोधन सुरू आहे. दरम्यान, आपण विकसित केलेल्या सॉफ्टवेअरमुळे संशयित रुग्णाचे एक्स-रे स्कॅन पाहून केवळ पाच सेकंदात कोरोनाचे निदान करता येईल असा दावा आयआयटी रुरकीच्या प्राध्यापकाने केला आहे.
कमल जैन असे या प्राध्यापकाचे नाव असून, ते सिव्हिल इंजिनियरिंग विभागात शिकावतात. त्यांनी 40 दिवसांच्या संशोधनानंतर हे सॉफ्टवेअर विकसित केले आहे. या सॉफ्टवेअरच्या पेटंटसाठी त्यांनी दावा केला आहे. तसेच या सॉफ्टवेअरच्या चाचणीसाठी त्यांनी आयसीएमआरकडे धाव घेतली आहे. दरम्यान, सॉफ्टवेअरची अद्याप पडताळणी झालेली नाही.
या सॉफ्टवेअरविषयी माहिती देताना कमल जैन यांनी सांगितले की, पहिल्यांदा सुमारे 60 हजार एक्स-रे स्कॅनची पडताळणी करवून मी आर्टिफिशियल इंटेलिजेंसवर आधारित डाटाबेस तयार केला. त्यातून कोविड-19, न्यूमोनिया आणि क्षयरोगाच्या रुग्णांच्या छातीमधील फरकाचा अभ्यास केला. तसेच मी अमेरिकेतील एनआयएच क्लिनिकल सेंटरमधील रुग्णांच्या छातीच्या एक्स-रेंची पडताळणी केली.
'मी तयार केलेल्या सॉफ्टवेअरमध्ये डॉक्टरांनी कुठल्याही रुग्णाच्या एक्स-रेचे छायाचित्र अपलोड केल्यानंतर हे सॉफ्टवेअर संबंधित रुग्णामध्ये न्यूमोनियाची लक्षणे आहेत का हे दाखवेल. तसेच ही लक्षणे कोविडमुळे आहेत की अन्य काही कारणांमुळे आहेत याचे अनुमान लावेल ही सर्व प्रक्रिया केवळ 5 सेकंदात पूर्ण होईल,' असे जैन यांनी सांगितले. तसेच ही चाचणी कमी खर्चिक ठरू शकते असा दावाही त्यांनी केला आहे.
दरम्यान, अमेरिकेतील अमेझॉन विद्यापीठात अशाच प्रकारचे संशोधन सुरू आहे. मात्र पण त्याला अद्याप यश मिळालेले नाही, असेही त्यांनी सांगितले. देशभरात आतापर्यंत कोरोनाचे 23 हजार 77 रुग्ण सापडले असून, 718 जनांचा मृत्यू झाला आहे.