हैदराबादः कोरोना व्हायरसचं संक्रमण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अनेक जण अद्यापही या व्हायरसच्या पार्श्वभूमीवर निष्काळजीपणा करत असल्याचं समोर आलं आहे. तेलंगणातही असंच एक प्रकरण समोर आलं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच फ्रान्सवरून एक व्यक्ती भारतात परतला होता. प्रशासनानं त्याला दोन आठवडे घरात नजरकैद होण्यास सांगितलं होतं. परंतु त्यानं क्वारंटाइनची चिंता न करता हजारोंच्या उपस्थितीत लग्न केलं. या क्वारंटाइनवर ठेवण्यात आलेल्या व्यक्तीच्या लग्नात हजारो लोक सहभागी झाल्यानं एकच खळबळ उडाली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा लग्न सोहळा गुरुवारी पार पडला आहे. लग्नासाठी तो हैदराबादहून दीड किलोमीटर दूर असलेल्या हनामकोंडा येथे आला होता. राज्याचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी लग्नसोहळ्यात फक्त 200 लोकांना आमंत्रित करण्याचं आवाहन केलं आहे. पण तरीही या व्यक्तीनं लग्नात हजारांहून अधिक लोकांना निमंत्रण दिलं. त्या व्यक्तीचा नातेवाईक हा मंत्री असल्याचं सांगितलं जातं आहे. लग्नानंतर थाटामाटात रिसेप्शन करायचाही प्लॅन होता. पण सीएमओ ऑफिसला याची माहिती मिळाल्यानंतर हे रिसेप्शन लागलीच रद्द करण्यात आलं. या लग्नात आता कोण कोण सहभागी झाले होते, याचा प्रशासन शोध घेत आहे. सर्वच पाहुण्यांवर नजर ठेवली जात आहे. पोलिसांच्या माहितीनुसार ही व्यक्ती 12 मार्चला फ्रान्सवरून परतली होती.
वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना व्हायरसचा कहर जगभरात पाहायला मिळत आहे. जगभरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 2,69,911 वर पोहोचली आहे. कोरोनामुळे 184 हून अधिक देश प्रभावित झाले असून मृत्यूची संख्या 11,267 वर पोहोचली आहे. भारतात कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 236 वर पोहोचली आहे. त्यात 32 विदेशी नागरिकांचा समावेश आहे. त्यामध्ये इटलीचे 17, फिलिपिन्सचे 2, ब्रिटनचे 2, कॅनडा, इंडोनेशिया, सिंगापूरच्या प्रत्येकी एका नागरिकांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : जगभरात कोरोना अलर्ट! जाणून घ्या, कोणत्या देशात किती कोरोनाग्रस्त?
‘...मग कोरोना व्हायरस गिळून ढेकर दिली असती की ईडीमागे लावून बोलती बंद केली असती?’
MP Crisis: ‘हे’ ट्विट सांभाळून ठेवा! सरकार कोसळल्यानंतर काँग्रेसच्या या दाव्याने पुन्हा खळबळ
Coronavirus : कोरोना नियंत्रणासाठी राज्यात युद्धपातळीवर प्रयत्न