Coronavirus: कोरोनाबाधितांना ब्लॅक फंगसनंतर आता व्हाईट फंगसचा धोका; या रुग्णांना अधिक धोका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2021 12:54 PM2021-05-20T12:54:15+5:302021-05-20T12:54:50+5:30
Coronavirus in India: आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांमध्ये ब्लॅक फंगस या आजाराचा संसर्ग दिसून आला होता. मात्र आता कोरोना रुग्णांमध्ये व्हाईट फंगसची समस्या दिसून येऊ लागली आहे.
नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने सध्या संपूर्ण देशात थैमान घातले आहे. दरम्यान, कोरोनाबाधितांमध्ये इतर आजारांचीही लक्षणे दिसू लागल्याने डॉक्टर आणि रुग्ण अशा दोघांच्याही अडचणीत वाढ झाली आहे. (Coronavirus in India) आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांमध्ये ब्लॅक फंगस या आजाराचा संसर्ग दिसून आला होता. मात्र आता कोरोना रुग्णांमध्ये व्हाईट फंगसची समस्या दिसून येऊ लागली आहे. पटना मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या कोरोनाच्या चार रुग्णांमध्ये व्हाईट फंगसचा संसर्ग दिसून आला आहे. (Coronaviruses now at risk of white fungus after black fungus; More risk to these patients)
पीएमसीएचच्या मायक्रोबायोलॉजी विभागाचे अध्यक्ष डॉ. एस.एन. सिंह यांनी कोरोनाबाधित रुग्णांमध्ये व्हाइट फंगसचा संसर्ग सापडल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. हे फंगस रुग्णाच्या त्वचेला नुकसान पोहोचवत आहे. तसेच व्हाइट फंगसचे उशिरा निदान झाल्यास ते जीवावरही बेतू शकते. डॉ. एस. एन. सिंह यांनी कोविड आणि पोस्ट कोविड रुग्णांना व्हाईट फंगसच्या आजाराकडे गांभीर्याने पाहण्याचे आवाहन केले आहे. अॉक्सिजन सपोर्टवर असलेल्या रुग्णांना या आजाराचा धोका अधिक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
दरम्यान, सध्या देशातील कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या घटत असली तरी कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण वाढले आहे. तसेच कोरोनाबाधित रुग्णांमध्ये ब्लॅक फंगस या आजाराचा संंसर्ग दिसून येत असून, त्यामुळे काही जणांचा मृत्यूही झाला आहे.