CoronaVirus News: राज्यांना कोरोना लस देण्यासाठी उभारणार डिजिटल यंत्रणा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 03:23 AM2020-08-13T03:23:29+5:302020-08-13T06:46:34+5:30
रशियात तयार झालेल्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या उत्पादनासाठी निधी उपलब्ध करून देणाऱ्या रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड या संस्थेने म्हटले आहे की, या लसीचे उत्पादन भारतासहित अनेक देशांत होईल.
नवी दिल्ली : रशियाने कोरोना प्रतिबंधक लस तयार केल्याचे जाहीर केल्यानंतर त्या देशाकडून ही लस विकत घेता येईल का तसेच त्या लसीचा साठा कशारीतीने करता येईल आदी गोष्टींचा विचार करण्यासाठी कोरोना लसीसंदर्भातील विशेष समितीची बुधवारी पहिली बैठक झाली. त्यात राज्यांना कोणाकडूनही थेट लस विकत घेण्याचा अधिकार नाही, हे स्पष्ट करण्यात आले. मात्र राज्यांना लस वितरित करण्यासाठी व पारदर्शक कारभाराकरिता डिजिटल यंत्रणा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल होते तर आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषणही यावेळी उपस्थित होते. रशियात तयार झालेल्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या उत्पादनासाठी निधी उपलब्ध करून देणाऱ्या रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड या संस्थेने म्हटले आहे की, या लसीचे उत्पादन भारतासहित अनेक देशांत होईल. या लसीच्या मानवी चाचणीचा तिसरा टप्पा भारत, सौदी अरेबिया, युएई, ब्राझिल, फिलिपिन्स आदी देशांमध्ये पार पडणार आहे.
कोरोना प्रतिबंधक लसीसंदर्भात नेमलेल्या विशेष समितीच्या बैठकीत असे ठरविण्यात आले की, प्रत्येक राज्याचे सरकार व संबंधित यंत्रणा यांच्याशी लसीचे उत्पादन व वितरण या मुद्द्यावर सविस्तर चर्चा करण्यात येईल. तसेच राष्ट्रीय स्तरावर लसीकरण कोणत्या पद्धतीने केले जावे यासाठी एक रुपरेषाही आखण्याचा निर्णय या समितीने घेतला. कोरोना प्रतिबंधक लसीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन केल्यानंतर त्याचा साठा करण्यासाठी देशात पुरेशी शीतगृहे असणे आवश्यक आहे.
ती यंत्रणा अधिक सक्षम करता येईल या विषयावरही समितीच्या बैठकीत चर्चा झाली. भारतामध्ये लसींचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक लसीचे भारतात मोठ्या प्रमाणावर उत्पादन भविष्यात झाल्यास ती लस शेजारी देशांनाही निर्यात करणे शक्य होणार आहे. रशियाने कोरोना प्रतिबंधक लस तयार केली असली तरी तिच्या गुणवत्तेबद्दल जागतिक आरोग्य संघटना, अमेरिका, जर्मनीसारख्या प्रगत देशांनी शंका व्यक्त केली आहे.
लस सुरक्षित असणे अतिशय महत्त्वाचे
एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितले की, रशियाने कोरोना प्रतिबंधक लस तयार केली असली तरी ती रुग्णांसाठी कितपत प्रभावी ठरते आहे हे बारकाईने तपासून पाहावे लागेल. या लसीमुळे रुग्णाच्या तब्येतीवर कोणताही दुष्परिणाम झाला नाही तरच तिची गुणवत्ता सिद्ध होईल. या लसीमुळे रुग्णाच्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती किती वाढते हेही तपासले जायला हवे. जर सर्व निष्कर्ष समाधानकारक असतील तर रशियाने बनविलेली कोरोना प्रतिबंधक लस भारतासाठीही खूप उपयोगी ठरू शकेल.