Coronavirus : घाबरू नका; अनावश्यक खरेदी टाळा, सरकारचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 05:01 AM2020-03-20T05:01:29+5:302020-03-20T05:02:00+5:30
कोरोना व्हायरसपासून बचावण्यासाठी फक्त परदेशांतून येणाऱ्या लोकांबाबत जास्त सावधगिरी व खबरदारी घेतली जात आहे.
- संतोष ठाकूर
नवी दिल्ली : सरकारने लोकांनी घाबरून जाऊन अनावश्यक खरेदी करू नका, असा सल्ला गुरुवारी दिला. सरकारने देशात ना कोणत्याही आणीबाणीची घोषणा केली आहे ना त्या दिशेने पावले उचलली जात आहेत. कोरोना व्हायरसपासून बचावण्यासाठी फक्त परदेशांतून येणाऱ्या लोकांबाबत जास्त सावधगिरी व खबरदारी घेतली जात आहे. लोकांना हा सल्ला दिला जात आहे की, जर कोणतीही व्यक्ती परदेशांतून येत आहे तर त्याची भेट घ्यायच्या आधी त्याला १४ दिवस एकांतवासात ठेवावे. त्याच्यापासून ठराविक अंतर राखावे. १४ दिवसांचा एकांतवास पूर्ण होईल व त्याच्यात कोरोनाची लक्षणे आढळणार नाहीत तेव्हा त्याच्या जवळ जावे.
अफवांवर विश्वास ठेवू नका
एका वरिष्ठ अधिकाºयाने म्हटले की, अशी अफवा पसरली आहे व भ्रम निर्माण झाला आहे की, सरकार देशात लॉक-डाऊन किंवा आणीबाणी जाहीर करणार आहे. हे समजून घ्यायची गरज आहे की, फक्त आवश्यक ती पावले उचलली जात आहेत. वेगवेगळ्या संस्थांना सांगण्यात आले आहे की, त्यांनी कर्मचाऱ्यांना शक्य होईल तेवढे घरून काम करण्यास सांगावे.