उत्तर प्रदेशच्या फिरोजाबाद येथे एका रहस्यमय तापानं गावकरी दहशतीच्या सावटाखाली जगत आहेत. या रहस्यमय तापानं आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे गावकरी चिंतेत आहेत. नेमकं हा आजार काय आहे हे जाणून घेण्यासाठी आरोग्य विभागाची टीम गावात तपासासाठी पोहचली आहे. टीमने ७९ लोकांची तपासणी करून त्यांना औषधं दिली आहेत. मात्र या तापामुळे होत असल्यानं मृत्यूनं गावकरी भयभीत झाले आहेत.
फिरोजाबाद येथील नगला पान सहाय येथील गावकरी तापाने ग्रस्त आहेत. महिनाभरापूर्वी गावच्या ३० वर्षीय लवकुशचा तापाने मृत्यू झाला होता, असे ग्रामस्थांनी सांगितले. तर त्याच्या ३ दिवसापूर्वी गावच्या ओसपालचेही निधन झाले. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार त्याचादेखील तापाने मृत्यू झाला. ओसपालच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी राधा देवी, मुलगी भूमिका यांनाही तापाने ग्रासले आहे. रामदेव शर्मा, त्यांची पत्नी सीमा शर्मा यांनाही ताप आला आहे.
हे लोक पडले आजारी
गावातील प्रमोद कुमार, लकी, अनूप, कविता, सीमा, कृष्णा, प्रेमवती, रजनी आणि गावातील अन्य ग्रामस्थही तापाने ग्रस्त आहेत. गावातल्या घरोघरी लोकांना तापाचा त्रास होत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. काही लोकांना जास्त तापामुळे उठणे देखील शक्य नाही. याची माहिती मिळताच आरोग्य विभागाची टीम गावात पोहोचली आणि उपचार सुरू केले. डॉक्टर दिनेशचंद्र शर्मा यांच्या नेतृत्वात आलेल्या पथकाने गावकऱ्यांवर उपचार करून औषधे दिली. सीएमओ डॉ. नीता कुलश्रेष्ठ यांनी सांगितले की, गावात ७९ जणांची तपासणी करून त्यांना औषधे दिली गेली आहेत. जिथे अशी काही तक्रार असेल तेथे त्वरित विभागाला कळवा असंही आवाहन त्यांनी केले आहे.
विक्रमी ८० लाख लोकांनी घेतली लस
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे जगभरात हाहाकार पाहायला मिळाला होता. रुग्णसंख्येने तब्बल १७ कोटींचा टप्पा पार केला आहे. भारतातही दुसऱ्या लाटेमुळे मोठ्या प्रमाणात हाहाकार माजला होता. भारतात आतापर्यंत लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे सर्व उपाय केले जात आहेत. मास्क, सोशल डिस्टंसिंग, होम क्वारंटाईन, आयसोलेशनच्या माध्यमातून काळजी घेतली जात आहे. याच दरम्यान सर्वच देशांमध्ये लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल ३,८८,१३५ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशात कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार सोमवारी देशभरात तब्बल ८० लाखांपेक्षा अधिक लोकांचं लसीकरण करण्यात आलं. देशात लसीकरण करण्यात आलेली ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे.