Coronavirus : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना कोरोनाची लागण; झाले होम क्वारंटाईन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2021 11:25 AM2021-04-14T11:25:25+5:302021-04-14T11:27:00+5:30
Coronavirus : अखिलेश यादव झाले होम क्वारंटाईन, योगी आदित्यनाथांच्या कार्यालयातील कर्मचारीही पॉझिटिव्ह
गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा परिस्थित सरकारकडून काळजी घेण्याचं आवाहनही करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत विक्रमी वाढ नोंदवली जात आहे. दरम्यान, समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी ट्विटरवरून यासंदर्भात माहिती दिली. तसंच आपण स्वत: आयसोलेशनमध्ये असल्याचंही त्यांनी सांगितलं.
"माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी आयसोलेशमध्ये असून घरातच उपचार सुरू आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनीही त्यांची कोरोना चाचणी करून घ्यावी. त्या सर्वांनी काही दिवस आयसोलेशनमध्ये राहावं अशी विनंती मी करत आहे," असं अखिलेश यादव म्हणाले. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली. काही दिवसांपासून त्यांना हलका ताप होता. त्यानंतर त्यांनी कोरोनाची चाचणी केली. यामध्ये त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याचं सांगण्यात आलं.
अभी-अभी मेरी कोरोना टेस्ट की रिपोर्ट पॉज़िटिव आई है। मैंने अपने आपको सबसे अलग कर लिया है व घर पर ही उपचार शुरू हो गया है।
— Akhilesh Yadav (@yadavakhilesh) April 14, 2021
पिछले कुछ दिनों में जो लोग मेरे संपर्क में आये हैं, उन सबसे विनम्र आग्रह है कि वो भी जाँच करा लें। उन सभी से कुछ दिनों तक आइसोलेशन में रहने की विनती भी है।
योगी आदित्यनाथांच्या कार्यालयातील कर्मचारीही पॉझिटिव्ह
कोरोना विषाणूनं संपूर्ण देशात थैमान घातलं आहे. आता याचा प्रकोप उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत पोहोचला आहे. यामुळेच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वतःला आयसोलेट केले आहे. त्यांच्या कार्यालयातील काही अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आता सर्व कामे व्हर्च्युअली करतील.
''माझ्या कार्यालयातील काही अधिकारी कोरोना संक्रमित झाले आहेत. हे अधिकारी माझ्या संपर्कात होते, त्यामुळे खबरदारी म्हणून मी स्वतःला आयसोलेट केले आहे आणि सर्व कामे व्हर्च्युअली सुरू करत आहे,'' असं योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं होतं.