नवी दिल्ली: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने आता टेलीफोनिक सर्वेक्षण घेण्याचा निर्णय घेतला आहे. १९२१ या क्रमांकावरुन देशभरातील जनतेला कॉल करुन कोरोनाच्या लक्षणाबाबत विचारले जाणार आहे. त्यामुळे जनतेने या सर्वेक्षणाद्वारे सरकारला सहकार्य करण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
सरकारने १९२१ या क्रमांकावरुन देशातील जनतेला कॉल करुन आरोग्यबाबतची माहिती विचारण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारकडून येणाऱ्या कॉलवर तुम्हाला तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता विचारला जाईल. तसेच तुम्ही जर परदेशात प्रवास केला असेल तर या प्रवासाबद्दलची माहिती विचारली जाणार आहे. त्याचप्रमाणे तुमच्या कुटुंबातील सदस्याला किंवा तुमच्या नातेवाईकाला कोरोनाची लागण झाली आहे की नाही असा प्रश्न देखील सरकारकडून आता या सर्वेक्षणाच्या माध्यमातून विचारला जाणार आहे. कोरोनाचा धोका कमी करण्यासाठी सरकारकडून टेलीफोनिक सर्वेक्षण केला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या १९ हजार ९८४ वर पोहचली आहे. तर ६४० जणांचा मृत्यू झाला आहे. १५ हजार ४७४ जणांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून ३८७० लोकांना उपचारानंतर घरी पाठण्यात आले आहे. तसेच गेल्या १५ तासांत देशभरात कोरोनामुळे ३७ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे तर १३८३ कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. मात्र दिलासा देणारी बाब म्हणजे ६१० जणांनी कोरोनाविरुद्धचा लढा यशस्वीपणे दिला असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच आता ३००० हून अधिक लोकांनी कोरोनावर मात करून ही लढाई जिंकली असल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले.