- शीलेश शर्मा नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे नेते गुजरातच्या विकासाच्या मॉडेलचा सतत ढोल वाजवतात, पण कोरोनाचे रुग्ण मरण पावण्याचे प्रमाण गुजरातमध्येच सर्वाधिक आहे. त्यामुळे अधिक लोक संसर्गजन्य आजाराने मरण पावणे, हेच भाजपचे विकासाचे मॉडेल आहे की काय, असा सवाल काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी केला.गुजरातच्या विकासाचा दावा किती तथ्यहीन आहे, हे कोरोनाचे रुग्ण मरण्याचे प्रमाण पाहून उघडच झाले आहे. देशात कोरोनाचे रुग्ण मरण्याचे प्रमाण गुजरातमध्येच सर्वाधिक आहे, असे सांगून राहुल गांधी म्हणाले की, गुजरातमध्ये कोरोनाच्या रुग्णांचा मृत्युदर ६.२५ टक्के आहे. महाराष्ट्रात मृत्युदर ३.७३ टक्के आहे, तर राजस्थानात तो २.३२ टक्के आहे. पंजाबमध्ये मृत्यूचे प्रमाण २.१७ टक्के असून, पुडुच्चेरीमध्ये १.९८ टक्के, छत्तीसगडमध्ये 0.३५ आणि झारखंडमध्ये 0.५ टक्के इतकेच आहे.एकीकडे काँग्रेसशासित आणि काँग्रेस सत्तेत सहभागी असलेली सरकारे अत्यंत संवेदनशीलतेने कोरोनाचा प्रश्न हाताळत आहेत, कमीतकमी मृत्यू होतील, यासाठी विविध प्रयत्न करीत आहेत आणि विकासाचे मॉडेल असलेल्या राज्यात मात्र रुग्ण मरण पावण्याचे प्रमाण वाढत आहे, अशी टीकाही त्यांनी केली.बेरोजगारी तिपट्टीने वाढली...लॉकडाऊनच्या काळात अन्य राज्यांच्या तुलनेत गुजरातमध्ये बेरोजगारी वाढत आहे. मार्चमध्ये तेथे बेरोजगारी ६.७ टक्के होती. एप्रिलमध्ये ती जवळपास तिप्पट म्हणजे १८.७ टक्के झाली. मे आणि जूनचे आकडे येतील, तेव्हा बेरोजगारी अधिक वाढली असेल. वस्त्रोद्योग ठप्प झाला आहे. लघु, सूक्ष्म आणि मध्यम उद्योगांची अवस्था गुजरातमध्ये अत्यंत बिकट आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
CoronaVirus News: "रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण गुजरातमध्ये सर्वाधिक; हेच का विकासाचं मॉडेल?"
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 3:59 AM