नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या फैलावामुळे सध्या देशात बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे. एकीकडे अनलॉक सुरू झाले असले तरी दररोज देशभरात कोरोनाचे पन्नास हजारांहून अधिक रुग्ण सापडत असल्याने सरकारसमोर गंभीर आव्हान उभे राहिले आहे. दरम्यान, देशातील कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येवरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा टीकेचे लक्ष्य केले आहे.
राहुल गांधी यांनी २४ तासांत भारतामध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडल्याचा आलेख ट्विटरवर शेअर केला. तसेच त्याखाली पंतप्रधान नरेंद्र मोदींचे एक विधान उपहासात्मक पद्धतीने ट्विट केले. मोदींच्या म्हणण्यानुसार योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्याने कोरोनाच्याबाबतीत इतर देशांच्या तुलनेत भारतातील परिस्थिती नियंत्रणात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे विधान २७ जुलै रोजी केले होते. "योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्याने कोरोनाच्याबाबतीत इतर देशांच्या तुलनेत भारतातील परिस्थिती नियंत्रणात आहे. आज भारतात दररोज पाच लाखांहून अधिक कोरोनाच्या चाचण्या होत आहेत. येणाऱ्या काही आठवड्यात हे प्रमाण 10 लाखांपर्यंत वाढवण्याचे आमचे प्रयत्न आहेत," असे मोदी त्यावेळी म्हणाले होते.
दरम्यान, सध्या देशातील कोरोनाबाधितांच्या वाढीचे प्रमाण प्रचंड वाढले असून, गेल्या काही दिवसांपासून सरासरी पन्नास हजारांहून अधिक रुग्ण सापडत आहेत. गेल्या २४ तासांमध्ये देशात कोरोनाचे ५२ हजार ९७२ रुग्ण सापडले असून, एकूण कोरोनाबाधितांच्या संख्येने अठरा लाखांचा टप्पा पार केला आहे.