देशात दररोज सापडणाऱ्या कोरोनाबाधितांच्या (Corona patient) संख्येत आज मोठी घसरण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून साडे तीन लाखांवर हे रुग्ण सापडू लागले होते. मात्र, आजच्या आकड्याच तब्बल 29,847 घसरण झाल्याने दुसऱ्या लाटेत सापडलेल्या देशवासियांसाठी एक मोठा दिलासा ठरला आहे. (India reports 3,23,144 new #COVID19 cases, 2771 deaths and 2,51,827 discharges in the last 24 hours, as per Union Health Ministry)
सोमवारी जाहीर करण्यात आलेल्या नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीमध्ये 3,52,991 नवे रुग्ण आढळले होते. तर कोरोनामुळे 2812 जणांचा मृत्यू झाला होता. मृतांचा आकडा आजवरचा सर्वाधिक आकडा होता. तसेच 2,19,272 रुग्ण बरे झाले आहेत. मात्र, आज जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीमध्ये थेट 29,847 रुग्णांची घसरण झाली आहे. अनेक राज्यांमध्ये नाईट कर्फ्यू, लॉकडाऊन लावण्यात आला आहे. यामुळे हळू हळू ही घरसण पहायला मिळण्याची शक्यता आहे.
१८ ते २५ एप्रिलमध्ये देशात २२ लाख नवे रुग्ण
देशात १८ ते २५ एप्रिल या काळात २२ लाख ४९ हजार नवे रुग्ण वाढले तसेच उपचाराधीन रुग्णांची संख्या २८ लाखांहून अधिक झाली. तसेच या कालावधीत कोरोनामुळे १६ हजार जणांचा बळी गेला आहे. या आठवड्यात देशात इतके रुग्ण वाढले की तो विश्वविक्रमच झाला. कोरोना रुग्णांचा मृत्यूदर मात्र अद्यापही १.१३ टक्के इतका कमी राखण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले. बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ८२.६ टक्के आहे.
भारतातील कोरोनाची परिस्थिती विदारक असून यावर मात करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेकडून मदत केली जात असल्याचे टेड्रोस ऍधानॉम घेबरेयेसस यांनी म्हटले आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडून जे शक्य आहे, ते सर्व केले जात आहे. महत्वाच्या साधनसामुग्रीचा पुरवठा केला जात आहे, असे टेड्रोस ऍधानॉम घेबरेयेसस यांनी सांगितले. तसेच, हजारहून अधिक ऑक्सिजन कॉन्सट्रेटर, प्री फेब्रिकेटेड मोबाईल फील्ड हॉस्पिटल आणि प्रयोगशाळांचा पुरवठा जागतिक आरोग्य संघटनेकडून करण्यात येत आहे, असेही ते म्हणाले.