Coronavirus: "अन्य देशांपेक्षा भारताची स्थिती आटोक्यात; वेळेत उपाय योजल्याने झाले शक्य"
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2020 12:25 AM2020-06-28T00:25:53+5:302020-06-28T08:23:38+5:30
कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहेत, जनतेच्या सहभागामुळे हा लढा शक्य झाला आहे. यापुढेही मास्कचा वापर करीत अधिक काळजी घेत सतर्क राहावे लागेल, असे मोदी यांनी सांगितले.
नवी दिल्ली : कोरोनावर नियंत्रण आणण्यात भारताला अपयश येईल, असे सर्वांना वाटत होते. पण लॉकडाऊन, निर्बंध आणि जनतेला विश्वासात घेऊन सरकारने उचललेली पावले यांमुळे अन्य देशांच्या तुलनेत भारताची स्थिती बऱ्यापैकी आटोक्यात आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले.
केरळमधील रेव्हरंड जोसेफ मार थोमा यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदी यांनी त्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे शुभेच्छा दिल्या. मोदी म्हणाले, कोरोना हा केवळ शारीरिक आजार नसून, हे मोठे संकट आहे आणि सारे जग कोरोनाशी झुंज देत आहे. या लढ्यासाठी प्रत्येक भारतीयाला आपली जीवनशैली बदलावी लागेल. चुकीच्या सवयी सोडाव्या लागतील.
कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहेत, जनतेच्या सहभागामुळे हा लढा शक्य झाला आहे. यापुढेही मास्कचा वापर करीत अधिक काळजी घेत सतर्क राहावे लागेल, असे मोदी यांनी सांगितले.
राहुल यांची टीका
देशात कोरोनाबाधितांची संख्या ५ लाखांवर गेली आहे. देशाच्या प्रत्येक भागात रुग्ण आढळत आहेत. पंतप्रधान मोदी यांच्याकडे कोरोनाविरुद्धच्या लढ्याची उपाययोजना नसल्यानेच हे घडत आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली. रुग्ण वाढत असले तरी मंत्रिगट वा आयसीएमआरची बैठक झालेली नाही. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पत्रकार परिषद घेण्याऐवजी निवेदन जारी करणे सुरू केले आहे. पंतप्रधानांसह सारेच प्रश्नांची उत्तर देणे टाळत आहेत, असा आरोप त्यांनी केला.