नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने सध्या देशात थैमान घातले आहे. मोठ्या प्रमाणावर रुग्णवाढ होत असल्याने उपचारांसाठी आवश्यक साधनसामुग्रीची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झालेली आहे. (coronavirus in India) त्यात कोरोनामुळे प्रकृती गंभीर बनलेल्या श्वसनास त्रास होत असलेल्या रुग्णांना आवश्यक असलेल्या ऑक्सिजनचीही टंचाई निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे. (Oxygen shortage in India ) बाधित रुग्णांच्या नातेवाईकांना ऑक्सिजनसाठी धावपळ करावी लागत आहे. दरम्यान, देशात ऑक्सिजनचे उत्पादन हे मागणीपेक्षा अधिक असल्याचे समोर येत आहे. मात्र तरीही निर्माण झालेल्या ऑक्सिजनच्या टंचाईमागचे धक्कादायक कारण समोर आले आहे. (India's production exceeds demand for oxygen, yet created scarcity, shocking reason )
केंद्र सरकारने रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा वाढवण्यासाठी उद्योगांना ऑक्सिजन पुरवण्यावर बंदी घातली आहे. त्यामुळे आता केवळ ९ अत्यावश्यक उद्योगांनाच ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. रिलायन्स, टाटा स्टील, सेल, जिंदाल स्टिल यांनी कोरोना रुग्णांवरील उपचारांसाठी ऑक्सिजनचा पुरवठा सुरू केला आहे. इफको या खत बनवणाऱ्या सहकारी संस्थेने ऑक्सिजन प्लँटची उभारणी सुरू केली आहे. येथून रुग्णालयांना मोफत ऑक्सिजनचा पुरवठा होणार आहे. तसेच मागणीची पूर्तता करण्यासाठी ५० हजार मेट्रिक टन मेडिकल ऑक्सिजनची आयात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोनाकाळापूर्वी देशात लिक्विड मेडिकल ऑक्सिजनची दररोज सरासरी ७०० मेट्रिक टन एवढी मागणी होती. कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये ही मागणी २८०० मेट्रिक टन प्रतिदिन एवढी झाली. दरम्यान दुसऱ्या लाटेमध्ये ही मागणी ५००० मेट्रिक टनपर्यंत पोहोचली आहे.
देशातील ऑक्सिजनचे दैनंदिन उत्पादन मागणीपेक्षा अधिक आहे. १२ एप्रिलच्या आकडेवारीनुसार देशात दैनंदिन उत्पादन क्षमता ७ हजार २८७ मेट्रिक टन एवढी आहे. तर दैनंदिन मागणी ३ हजार ८४२ मेट्रिक टन एवढी आहे. मागणी ५००० मेट्रिक टनपर्यंत पोहोचली तरी ती उत्पादन क्षमतेपेक्षा कमी आहे.
देशामध्ये सध्या मेडिकल आणि इंडस्ट्रियल ऑक्सिजनचा सध्याचा साठा हा ५० हजार मेट्रिक टन एवढा आहे. इंडस्ट्रियल ऑक्सिजनला मेडिकल ग्रेडमध्ये परिवर्तित करण्यासाठी तो ९३ टक्के शुद्ध करावा लागतो. मात्र त्यामधील खरी समस्या ही ऑक्सिजनला संबंधित रुग्णालयांपर्यंत पोहोचवण्याची आहे.
सध्या देशामध्ये लिक्विड ऑक्सिजनची वाहतूक करण्यासाठी क्रायोजेनिक टँकर पुरेशा संख्येमध्ये उपलब्ध नाही आहेत. संसर्गाचे प्रमाण अधिक आहे. तसेच एकाचवेळी अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होत आहे. सध्या देशात सिलेंडर आणि त्यासोबत वापरण्यात येणाऱ्या उपकरणांची टंचाई आहे. त्यामुळे अनेक रुग्णालयांना ऑक्सिजन मिळत नाही आहे.