नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसमुळे हाहाकार माजला आहे. देशातही वेगाने पसरणाऱ्या आणि भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनाने थैमान घातले आहे. गेल्या 24 तासांत 1486 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत, तर 49 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात 20 हजारहून अधिक लोकांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आहे. तर 652 लोकांचा मृत्यू झाला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या 20471 वर पोहोचली आहे. यामध्ये 3959 रुग्ण बरे झाले आहेत. तर 15859 जणांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. याशिवाय, देशात आतापर्यंत कोरोनामुळे 652 लोकांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर, गेल्या 24 तासांत 1486 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत, तर 49 जणांचा मृत्यू झाला आहे.
देशभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. प्रत्येक राज्यात कोरोनाबाधितांचे आकडे बदलत आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाचे रुग्ण आणि मृतांचे प्रमाण कसे रोखता येईल यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे.दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा वाढत असतानाच मंगळवारी एकाच दिवशी कोरोनाच्या 150 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. ही दिलासादायक बाब असून आतापर्यंत 722 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आलेल्या 722 जणांपैकी सर्वाधिक 441 पुरुष आहे, तर 281 या महिला आहेत. त्यामध्ये 31 ते 50 या वयोगटातील 318 रुग्णांचा समावेश आहे. त्या खालोखाल 21 ते 30 वयोगटातील 160 रुग्ण बरे झाले आहेत. तर 98 रुग्ण हे 51 ते 60 वयोगटातील आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे 91 ते 100 वयोगटातील एका तरुणानेही कोरोनावर मात केली आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाउन करण्यात आले आहे. कोरोनावर उपाय योजनेसाठी केंद्र आणि राज्य सरकारने कडक पावलं उचलली आहे. लॉकडाउनचा हा दुसरा टप्पा सुरू आहे. येत्या 27 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील सर्व मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करणार आहे. या चर्चेत कोरोना लढ्याची पुढची दिशा ठरवली जाण्याची शक्यता आहे.
जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 25 लाखांवर पोहोचली असून लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. भारतासह अनेक देशांनी कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. अमेरिका, स्पेन, इटली या देशांमध्ये सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण आहेत. तसेच, या देशांमध्ये कोरोनामुळे अनेक लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.