नवी दिल्ली – देशात कोरोना संक्रमणाची दुसरी लाट(Corona Virus Second Wave) ओसरत असली तरी वैज्ञानिकांकडून वारंवार कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत दिले जात आहेत. तिसऱ्या लाटेचा धोका असताना अनेक राज्यांनी पुन्हा शाळा सुरू करण्याची(School Reopening) तयारी सुरू केली आहे. याच दरम्यान ICMR चे डॉ. बलराम भार्गव यांनी शाळा सुरू करण्याबाबत मोठं विधान केले आहे.
मंगळवारी आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत डॉ. बलराम भार्गव यांना शाळा उघडण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा ते म्हणाले की, सुरुवातीच्या काळात प्राथमिक शाळा उघडल्या जाऊ शकतात. कारण मोठ्या माणसांच्या तुलनेत छोट्या मुलांमध्ये कोरोना संक्रमणाचा धोका कमी आहे. यूरोपातील अनेक देशात कोरोनाच्या वाढत्या काळातही प्राथमिक शाळा(Primary School) उघडण्यात आल्या आहेत. त्यामुळे देशातही प्राथमिक शाळा सुरू केल्या जाऊ शकतात. त्यानंतर माध्यमिक शाळा उघडता येतील असं त्यांनी सांगितले.
मोठ्या माणसांच्या तुलनेत छोटी मुलं सहजरित्या व्हायरसचा सामना करत आहेत. छोट्या मुलांच्या लंग्समध्ये ACE रिसेप्टर्स कमी असतं ज्याठिकाणी व्हायरस हल्ला करतं. कारण मुलांमध्ये ACE रिसेप्टर्स कमी असतं त्यामुळे लहान मुलांमध्ये संक्रमणाचा धोका कमी प्रमाणात आढळतो. परंतु त्याचसोबत ६ ते ९ वयोगटातील मुलांमध्ये ५७.२ टक्के अँन्टिबॉडी आढळल्या आहेत. जे मोठ्या माणसांप्रमाणे आहेत असं भार्गव म्हणाले.
दरम्यान, कोरोना काळात यूरोपमध्ये अनेक देशात प्राथमिक शाळा बंद करण्यात आल्या नव्हत्या. त्यामुळे भारतातही सुरुवातीला प्राइमरी स्कूल उघडले जाऊ शकतात. त्यानंतर माध्यमिक शाळा उघडता येतील. परंतु शाळेमधील जितकाही सपोर्ट स्टाफ आहे त्यात टीचर, बस ड्रायव्हर आणि इतर कर्मचारी वर्गाचं लसीकरण होणं आवश्यक आहे असंही डॉ. बलराम भार्गव यांनी सांगितले.
एम्सचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया काय म्हणाले?
भारतात अनेक शाळा कोरोनाच्या पहिल्या लाटेपासूनच बंद आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीत काही ठिकाणी १० वी आणि १२ वीचे वर्ग भरवण्यात आले होते. परंतु कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ते पुन्हा बंद करण्यात आले."ज्या ठिकाणी कोरोना विषाणूच्या केसेस कमी आहेत, त्या ठिकाणच्या शाळा सुरू करण्याबाबत मी सांगत आहे. ५ टक्क्यांपेक्षा कमी पॉझिटिव्हीटी रेट असलेल्या ठिकाणी अशी योजना आखली जाऊ शकते. परंतु संसर्ग पुन्हा वाढताना दिसल्यास त्या पुन्हा बंद केल्या जाऊ शकतात. परंतु जिल्ह्यांनी एका दिवसाआड विद्यार्थ्यांना शाळेत आणण्यावर विचार केला पाहिजे आणि शाळा सुरू करण्याच्या योजना आखल्या पाहिजे असंही गुलेरिया म्हणाले.
मुलांमध्ये चांगली इम्युनिटी
"मुलांच्या एकूण विकासात शालेय शिक्षणाचा अतिशय महत्त्व आहे. ऑनलाईन वर्गांपेक्षा मुलांना शाळेतील वर्गांमध्ये जाणं आवश्यक आहे. भारतात अतिशय कमी प्रमाणात मुलांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे आणि ज्यांना ती झाली आहे ते आपली इम्युनिटी चांगली असल्यामुळे लवकर बरे होण्यास सक्षम आहेत. सीरो सर्व्हेमध्ये याचा खुलासा झाला की मुलांमंध्ये वयस्क लोकांपेक्षा अधिक प्रमाणात अँटिबॉडिज आहेत. यामुळे शाळा उघडल्या गेल्या पाहिजे. जितकं शाळेत शिक्षण सोपं असतं तितकं ते ऑनलाईनमध्ये नाही, असंही गुलेरिया यांनी स्पष्ट केलं आहे.