Coronavirus: कोरोनामुळे जगात ५० लाख लोकांचा मृत्यू; भारत तिसऱ्या नंबरवर, डेल्टानं चिंता वाढली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2021 05:16 AM2021-10-03T05:16:30+5:302021-10-03T05:18:33+5:30
जगभरात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची दर आठवड्याची सरासरी काढली तर निम्मे मृत्यू अमेरिका, रशिया, ब्राझील, मेक्सिको, भारत या पाच देशांत होत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
वाॅशिंग्टन : जगभरात कोरोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या ५० लाखांवर पोहोचली आहे. त्यामध्ये अमेरिकेतील ७ लाख मृतांचा समावेश आहे. त्याखालोखाल ब्राझीलमध्ये ५ लाख ९७ हजार व भारतामध्ये ४ लाख ४८ हजार लोकांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे. अत्यंत घातक असलेेल्या डेल्टा विषाणामुळे जगभरात कोरोनाचा प्रसार झपाट्याने झाला असून त्यामुळे मृतांची संख्याही वाढली आहे.
जगातील एकूण लोकसंख्येपैकी निम्म्या लोकांना अद्याप कोरोना लस मिळालेली नाही. त्यामुळे त्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा सर्वाधिक धोका आहे. जगभरात कोरोनामुळे एका वर्षभरात २५ लाख लोक मरण पावले. मात्र डेल्टा विषाणूमुळे मृतांचे प्रमाण झपाट्याने वाढू लागले व पुढच्या २३६ दिवसांत आणखी २५ लाख लोकांचा मृत्यू झाला.
जगभरात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची दर आठवड्याची सरासरी काढली तर निम्मे मृत्यू अमेरिका, रशिया, ब्राझील, मेक्सिको, भारत या पाच देशांत होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. गेल्या आठवड्यात कोरोनामुळे जगात दररोज सरासरी ८ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. म्हणजेच या संसर्गामुळे दर मिनिटाला पाच जणांनी आपला जीव गमावला.
अमेरिकेत फ्लूपेक्षा कोरोना घातक
अमेरिकेमध्ये कोरोना रुग्णांची एकूण संख्या ४ कोटी ४४ लाखांवर पोहोचली असून तिथे ७ लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत १९१८ व १९१९ मध्ये फ्लूच्या साथीत ६ लाख ७५ हजार जणांनी जीव गमावला होता. त्यापेक्षा तिथे कोरोना साथीत अधिक जण मरण पावले. जगात कोरोनामुळे अमेरिकेत सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. सर्वात प्रगत व अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांनी सज्ज असलेल्या अमेरिकेत कोरोना लस देण्याचे प्रमाणही अधिक आहे. मात्र तेथील सर्व गणिते डेल्टा विषाणूने बदलून टाकली.
देशात आढळले २६ हजार नवे रुग्ण
गेल्या चोवीस तासांत भारतामध्ये कोरोनाचे २६,७२७ नवे रुग्ण आढळून आले असून, शुक्रवारपेक्षा या आकड्यात १३ टक्क्यांनी वाढ झाली. देशात ३ कोटी ३७ लाख ६६ हजार ७०७ कोरोना रुग्ण असून, त्यापैकी ३ कोटी ३० लाख ४३ हजार १४४ जण बरे झाले. गेल्या चोवीस तासांत २७७ जण या संसर्गाने मरण पावले.
भारत-ब्रिटनमध्ये चर्चा
भारताने दिलेल्या कोविशिल्ड लसीकरण प्रमाणपत्राला ब्रिटनमध्ये मान्यता देण्यासाठी दोन्ही देशांची चर्चा सुरू आहे, असे ब्रिटनने म्हटले आहे. याआधी अशी मान्यता नाकारणाऱ्या ब्रिटनला धडा शिकविण्यासाठी भारताने जशास तसे प्रत्युत्तर दिले होते. भारतामध्ये येणाऱ्या सर्वच ब्रिटिश नागरिकांना आता १० दिवसांच्या सक्तीच्या विलगीकरणात राहावे लागणार आहे.