Coronavirus: लॉकडाऊन शिथिल झाल्याचा परिणाम?; गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2020 11:03 AM2020-05-05T11:03:06+5:302020-05-05T11:13:08+5:30
Coronavirus Latest Marathi News: मे महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे.
नवी दिल्ली: देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 46 हजार 433 वर पोहचली आहे. तर आतापर्यंत 1568 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच गेल्या 24 तासांमध्ये आतापर्यत सर्वात जास्त रुग्णांची नोंद झाली आहे. देशभरात गेल्या 24 तासांमध्ये 3900 नवे रुग्ण आढळले असून 195 लोकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
लॉकडाऊनमधून काही प्रमाणात सूट मिळण्यास सुरुवात झाल्यापासून देशातील कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढू लागली आहे. देशभरात करोनाबाधित रुग्णांची संख्या पोहोचली 46, 433 वर, तर त्यांपैकी 12,727 रुग्ण बरे झाले आहे. तर आता एकूण 32,134 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली. गेल्या काही दिवसांपासून भारताचा मृत्यूदर कमी झाला होता. मात्र आता पुन्हा मृत्यूदरात वाढ झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
3900 #COVID19 cases & 195 deaths have been reported in the last 24 hours, the largest spike till now in both: Ministry of Health and Family Welfare https://t.co/Wi2KQBflAr
— ANI (@ANI) May 5, 2020
मे महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. 30 एप्रिलपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांची संख्या 1075 होती. परंतु गेल्या चार दिवसांत हा आकडा 1500च्या वर गेला आहे. म्हणजेच गेल्या चार दिवसात जवळपास 500 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
दरम्यान, देशात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा दुसरा टप्पा रविवारी संपल्यानंतर देशातील विविध भागात मोठ्या प्रमाणात सूट देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत कोरोनाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अगदी कोरोनाचा सर्वाधिक धोका असलेल्या रेड झोनमध्येही दारुची दुकाने उघडण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे दिसून आले होते.