Coronavirus: दिल्लीत तपासण्या झाल्या कमी, घरीच उपचार करण्यावर भर 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2021 12:22 AM2021-04-26T00:22:06+5:302021-04-26T00:22:15+5:30

संक्रमित रुग्णांचा दर कागदोपत्री ३३ टक्के, वास्तव मात्र वेगळेच

Coronavirus: Less tested in Delhi, emphasis on home treatment | Coronavirus: दिल्लीत तपासण्या झाल्या कमी, घरीच उपचार करण्यावर भर 

Coronavirus: दिल्लीत तपासण्या झाल्या कमी, घरीच उपचार करण्यावर भर 

Next

विकास झाडे

नवी दिल्ली : दिल्लीत कोरोना संक्रमणाचा दर एकूण तपासणीच्या ३३ टक्के कागदोपत्री दिसत असला तरी येथील स्थिती अत्यंत विदारक आहे. आजारी असलेले अनेक लोक कोरोना तपासणी करायला जात नाहीत. लक्षणे दिसली की घरीच उपचार घेणाऱ्यांची संख्याही खूप आहे. दिल्लीत दररोज सरासरी ७५ हजार लोकांची कोरोना तपासणी होत आहे. त्यातील ३३ ते ३७ टक्के रुग्ण हे कोरोनाबाधित झाल्याचे अहवालानंतर स्पष्ट होत आहे.

१९ एप्रिलपासून दिल्लीत लॉकडाऊन लावण्यात आले असले तरी या काळात तपासण्या कमी झाल्या आहेत. आधी १ लाखावर तपासण्या होत होत्या ती संख्या या आठवड्यात रोडावली आहे.  ३ लाख ८७ हजार ११० लोकांच्या तपासण्या झाल्या. त्यात ५५ टक्के आरटीपीसीआर आणि ४५ टक्के अँटिजन टेस्ट आहेत. त्यातील १ लाख २७ हजार ९३६ रुग्ण हे कोरोना संक्रमित आहेत.

तपासणीशिवाय उपचार

दिल्ली सरकार दररोज नवीन रुग्णांचे, तपासण्यांचे आणि मृत्यूचे आकडे जाहीर करते; परंतु दिल्लीची स्थिती याहीपेक्षा वेगळी आहे. ‘लोकमत’ने दिल्लीतील वेगवेगळ्या भागातील लोकांना फोन करून त्यांच्या आरोग्याची माहिती घेतली. बहुतांश फोनवर घरात एक किंवा त्यापेक्षा अधिक लोक ताप, खोकला, सर्दीने आजारी असल्याची माहिती मिळाली. त्यांनी कोरोनाची तपासणी करण्याचे टाळले आहे. रुग्णालयात जाऊन तपासणी करायचे? म्हणजे कदाचित कोरोनाचे संक्रमण नसेल तर गर्दीत जाऊन कोरोना घेऊन येणे, अशी भीती त्यांच्या मनात आहे. तपासणी केली तरी अहवाल यायला साधारणात ४ ते ७ दिवस लागत आहेत. तोपर्यंत रुग्णांचे काय करायचे? हा प्रश्न निर्माण झाला आहे.

घरी तपासणी बंद

आधी कोरोनाची तपासणी करायला खासगी पॅथलॅबची माणसं घरी यायची. त्यात लालपॅथ, मॅक्स सारख्या अनेकांचा समावेश होता; परंतु दिल्लीतील कोरोनाची स्थिती बिघडल्यानंतर खासगी लॅबने घरी जाणे बंद केले आहे. जे लोक पैसे देऊन तपासणी करू शकतात त्यांच्यापुढेही मोठा पेच निर्माण झाला आहे.

पाच दिवसांत १५३७ मृत्यू

लॉकडाऊन लागल्यानंतर गेल्या पाच दिवसांत १५३७ रुग्णांचा मृत्यू झाला. हे रुग्ण दिल्लीतील कोणत्या ना कोणत्या रुग्णालयात उपचार घेत होते किंवा कोविड सेंटरमध्ये विलगीकरणात होते. ज्यांची कोविड रुग्ण म्हणून नोंद नाही; परंतु मृत्यू झाला अशांचा दिल्ली सरकार जाहीर करीत असलेल्या आकड्यांमध्ये समावेश नाही. त्यामुळे दिल्लीतील रुग्णांचे आणि मृत्यूच्या संख्येचे वास्तव वेगळे आहे.

Web Title: Coronavirus: Less tested in Delhi, emphasis on home treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.