नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा तीन कोटींवर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 35,499 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल चार लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान एक मन हेलावणारी घटना समोर आली आहे. कोरोनामुळे एका तरुणाची फुफ्फुसं खराब झाली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपचारासाठी दररोज तब्बल दीड लाखांचा खर्च येत आहे. मुलाच्या उपचारासाठी पैसे जमा व्हावेत म्हणून आईची धडपड सुरू आहेत आतापर्यंत लाखो रुपये हे लोकवर्गणीतून जमा झाले. मात्र आता आणखी 40 लाखांची गरज असल्याची माहिती मिळत आहे.
कोलकाता येथील 30 वर्षीय जीतपाल सिंहला कोरोनाची लागण झाली आहे. जवळपास एक महिन्यापासून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोरोनामुळे त्याची फुफ्फुसं खराब झाली आहेत. आयसीयूमध्ये त्याला लंग सपोर्ट मशीनवर ठेवण्यात आलं आहे. डॉक्टरांनी तरुणावर आणखी एक महिना उपचार करण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. जीतपालची आई अल्पना सिंह यांनी आपल्या मुलाच्या तब्येतीची माहिती दिली आहे. गळ्यामध्ये पाईप असल्याने तो बोलू शकत नसल्याचं म्हटलं आहे.
लंग सपोर्ट मशीनवर असल्याने पुढचे तीस दिवस दररोज दीड लाख म्हणजे कमीतकमी 40 लाख रुपयांची आणखी गरज असल्याचं आईने म्हटलं आहे. गेल्या दोन महिन्यांपासून जीतपालचे मित्र त्याच्या उपचारासाठी पैसे जमा करत आहेत. त्याच्या उपचारासाठी लाखो रुपये जमा झाले. मात्र रोजचा खर्चच जास्त असल्याने ते पैसे आता संपले आहेत. आधीच 40 लाख खर्च आला आहे. त्यामध्ये आणखी 40 लाखांची आवश्यकता असल्याचं अल्पना सिंह यांनी म्हटलं आहे. डॉक्टरांनी जीतपालवार आणखी काही दिवस उपचार करावे लागणार असल्याचं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
भीषण, भयंकर, भयावह! डेल्टाहून अधिक जीवघेणा व्हेरिएंट येऊ शकतो समोर?; तज्ज्ञ म्हणतात...
कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेदरम्यान उद्भवलेला डेल्टा व्हेरिएंट सर्वाधिक घातक असल्याचं तज्ज्ञांकडून सांगण्यात आलं आहे. पण डेल्टाहूनही अधिक जीवघेणा व्हायरस येऊ शकतो का? याबाबत तज्ज्ञ सध्या संशोधन करत आहेत. कोरोना व्हायरसचा डेल्टा व्हेरिएंट इतर व्हेरिएंच्या तुलनेत सर्वाधिक संसर्गजन्य आणि घातक असल्याचं मत तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. रुग्णामध्ये याची लक्षणं कमी वेळात दिसून येत आहेत. तसेच डेल्टा व्हेरिएंटमुळे अन्य आजारांना देखील आमंत्रण मिळत आहे. चीनी संशोधकाच्या मते डेल्टा व्हायरस हा कोरोना व्हायरसच्या मुळ रुपाच्या तुलनेत तब्बल 1260 पट अधिक संसर्गजन्य आहे. काही अमेरिकन संशोधकांच्या मते, लसीकरण झालेल्या व्यक्तींनाही डेल्टाची लागण झाली आहे.