नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून देशात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. देशातील रुग्णसंख्येने उच्चांक गाठला आहे. गुरुवारी (22 एप्रिल) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात 24 तासांत कोरोनाचे 3,14,835 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 2,104 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 1,59,30,965 पोहोचली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 1,84,657 वर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 22,91,428 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 1,34,54,880 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. याच दरम्यान दिल्लीमध्ये कोरोनाने थैमान घातले आहे.
दिल्लीच्या तीन महानगरपालिकांने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या तीन दिवसांत तब्बल 1,057 लोकांचे अंत्यसंस्कार (Corona Death In Delhi) करण्यात आले असून हे अत्यंत भयानक आहे. तीन महानगरपालिकांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार दिल्लीत 18 एप्रिल ते 20 एप्रिल दरम्यान दररोज अंदाजे 352 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. तीन महानगरपालिकांच्या 9 क्षेत्रांत 21 स्मशानभूमी आणि कब्रस्तान आहेत. नगरपालिकेच्या आकडेवारीनुसार, 18 एप्रिल रोजी 290 अंत्यसंस्कार (372 अंत्यसंस्कार आणि 17 दफन), 19 एप्रिल रोजी 357 अंत्यसंस्कार (334 अंत्यसंस्कार आणि 23 दफन) आणि 20 एप्रिल रोजी 410 अंतिम संस्कार (391 अंत्यसंस्कार आणि 19 दफन) केले गेले आहे.
दिल्लीतील निगामबोध घाटवर सर्वात जास्त 208 लोकांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. दरम्यान, दिल्ली भाजपाचे प्रवक्ते हरीश खुराना यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर कोरोना रुग्णांच्या मृत्यूची आकडेवारी लपवल्याचा आरोप केला आहे. एकीकडे केजरीवाल सरकार कोविड आपत्कालीन परिस्थितीत पारदर्शकतेबद्दल बोलत आहेत आणि दुसरीकडे मृत्यूचे आकडे कमी दिले जात आहेत असं हरीश यांनी म्हटलं आहे. दिल्ली सरकारच्या म्हणण्यानुसार, 18 ते 20 एप्रिल दरम्यान 678 मृत्यू झाले आहेत. दिल्लीतील रुग्णसंख्येत देखील सातत्याने वाढ होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल (Sunita Kejriwal) यांना कोरोनाची लागण झाली आहे. यानंतर, आता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही स्वतःला आयसोलेट केले आहे. गेल्या वर्षी जून महिन्यात अरविंद केजरीवाल यांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. तेव्हा त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. दिल्लीतील सध्य स्थिती लक्षात घेता अरविंद केजरीवाल सातत्याने सक्रिय आहेत. तसेच बैठकांबरोबरच अनेक ठिकाणचा दौराही करत आहेत. राजधानी दिल्लीत सातत्याने कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. येथे रोजच्या रोज कोरोना बाधितांची विक्रमी संख्या नोंदविली जात आहे.