नवी दिल्ली - गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 1,61,736 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 879 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे आता भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 1,36,89,453 वर पोहोचली आहे. कोरोनाच्या संकटात आणखी एक धक्कादायक माहिती मिळत आहे. एका अवघ्या 11 दिवसांच्या बाळाला कोरोनाची लागण झाल्याची घटना समोर आली आहे. गुजरातच्या सूरतमधील बाळाला कोरोनाची लागण झाली असून ती चिमुकली सर्वात कमी वयाची कोरोना रुग्ण आहे.
मिळालेल्य़ा माहितीनुसार, 11 दिवसांची एक चिमुकली आपल्या जन्माच्या पाचव्या दिवसापासून कोरोना व्हायरसचा सामना करत आहे. नवजात बाळ आईच्या संपर्कात आल्याने कोरोना संक्रमित झाल्याचा डॉक्टरांचा अंदाज आहे. अमरोली भागातील एका 30 वर्षीय महिलेला 1 एप्रिल रोजी डिलिव्हरीसाठी डायमंड रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं आणि त्याच दिवशी महिलेने चिमुकलीला जन्म दिला. रुग्णालयातील बाल रोग विशेषज्ञ डॉक्टर अल्पेश सिंधवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळाच्या जन्मावेळी त्याला श्वास घेण्यास समस्या येत होती. मात्र ही सामान्य बाब असून अनेक बाळांमध्ये असा प्रकार दिसतो.
चिमुकलीला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं असून Remdesivir इंजेक्शन देण्यात आलं
बाळाला 5 एप्रिलपर्यंत आईचं दूध देण्याऐवजी फार्मूला फीड देण्यात आलं. 5 एप्रिल रोजी बाळाची स्थिती सुधारल्याने आईला दूध पाजण्यासाठी बोलवण्यात आलं. त्यानंतर 6 एप्रिल रोजी चिमुकलीला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने बाळाचा एक्स-रे करण्यात आला. 6 एप्रिल रोजी फुफ्फसं क्लिअर होती. मात्र पुढच्या दिवशी एक्स-रेमध्ये एक मोठी सफेद जागा दिसली, जेथे संक्रमण परसलं होतं. त्यानंतर अँटिजेन टेस्ट करण्यात आली, त्यात बाळाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. तेव्हापासून चिमुकलीला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं असून Remdesivir इंजेक्शन देण्यात आलं आहे. तसेच प्लाज्मा ट्रिटमेंटसाठीही योजना असल्याची माहिती डॉक्टर सिंधवी यांनी दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
राज्यातील आकडेवारी नवजात बालक ते 10 वर्षांपर्यंतच्या 1 लाखाहून अधिक मुलांना कोरोना
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील संसर्गाचा वेग जास्त असून, तरुण, वृद्धांसोबतच लहान मुलांमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढल्याचे धक्कादायक निरीक्षण समोर आले आहे. दररोज येणाऱ्या नव्या बाधितांमध्ये सरासरी 5 ते 7 टक्के रुग्ण ही लहान बालके असल्याचे आढळून आले आहे. वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या अहवालानुसार, राज्यात नवजात बालक ते दहा वर्षांपर्यंतच्या 1 लाख 1 हजार 809 बालकांना कोरोनाची बाधा झाली आहे. कोरोनाच्या एकूण रुग्णसंख्येत हे प्रमाण 3.09 टक्के आहे. पहिल्या लाटेत लहान मुलांना काेरोना होण्याचे प्रमाण कमी होते; परंतु आता हे प्रमाण वाढले आहे. काेरोनाचा नवा स्ट्रेन तीव्र स्वरूपाचा, लवकर पसरणारा आणि मृत्यूचे प्रमाण वाढविणारा आहे. पालक लहान मुलांना घराबाहेर घेऊन जातात. आवारात मुलांची गर्दी जमताना पहायला मिळत आहे. मुले एकत्र खेळतात. यामुळे त्यांना संसर्ग होण्याचे प्रमाण आता वाढले आहे. शिवाय कोरोना विषाणूनेही स्वरूप बदलल्याचा फटका लहान मुलांना बसू लागल्याचे मत बालरोगतज्ज्ञांनी व्यक्त केले.