नवी दिल्ली - कोरोनामुळे देशातील परिस्थिती गंभीर झाली आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली असून पुन्हा एकदा चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसागणिक वाढ होत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. तर दुसरीकडे ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. दिल्लीच्या जयपूर गोल्ड रुग्णालयामध्ये ऑक्सिजन अभावी 20 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. दिल्लीतील बत्रा आणि सर गंगाराम रुग्णालयामध्येही काही वेळ पुरेल इतकाच ऑक्सिजन साठा उपलब्ध आहे
जयपूर गोल्डन रुग्णालयाचे एमडी डॉ. डी के बलूजा यांनी दावा केला आहे की, काल रात्री ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे गंभीर असलेल्या 20 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीमध्ये आणखी एक रुग्णालय सरोजमध्येही ऑक्सिजनचा मोठा तुटवडा आहे. ऑक्सिजनचा तुटवडा असल्यामुळेच नव्या रुग्णांना भरती करत नसल्याचं तसंच आहे. बत्रा रुग्णालयात ऑक्सिजनचा एक टँकर पोहचवण्यात आला आहे. डॉक्टर गुप्ता यांनी रुग्णालयाला 500 किलो ऑक्सिजन ट्रकने पोहचवण्यात आला. मात्र तो फक्त एक तासापुरताच उपलब्ध आहे. रुग्णालयात 260 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
कोरोनाचा हाहाकार! सलग तिसऱ्या दिवशी 3 लाखांचा टप्पा पार; रुग्णसंख्या तब्बल दीड कोटीवर
गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 3,46,786 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 2,624 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 1,66,10,481 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 1,89,544 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. शनिवारी (24 एप्रिल) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे तीन लाखांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दीड कोटीवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 1,89,544 वर पोहोचला आहे.
कोरोनाचा भयावह वेग! मे महिन्यात देशात दररोज होऊ शकतात 5000 मृत्यू; रिसर्चमधून तज्ज्ञांचा गंभीर इशारा
कोरोनामुळे काही ठिकाणी भीषण चित्र निर्माण झालं आहे. रुग्णालयात ऑक्सिजन आणि बेडची मोठी कमतरता निर्माण झाली आहे. दुसरी लाट अत्यंत भयंकर आहे. याच दरम्यान पुन्हा एकदा धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे. देशात मे महिन्याच्या मध्यावधीत दररोज 5 हजारांहून अधिक मृत्यू होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन हजारांहून अधिक करोना मृत्यूची नोंद होत असताना संशोधनातून ही माहिती आता समोर आली आहे. वॉशिंग्टन विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्युशनने ((IHME) चिंता वाढवणारा इशारा दिला आहे. कोरोनामुळे भारतातील परिस्थिती पुढील काही आठवड्यात आणखी वाईट होईल असं म्हटलं आहे. तज्ज्ञांनी भारतातील सध्याचा संसर्गाची आणि मृत्यू सरासरी यांचाही अभ्यास केला आहे. रिपोर्टनुसार, भारतात कोरोना मृतांची संख्या शिखरावर पोहोचण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच गंभीर परिस्थितीचा इशारा देण्यात आला आहे.