नवी दिल्ली - देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसागणिक वाढ होत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. तर दुसरीकडे ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. अनेक रुग्णालयांनी आपल्या रुग्णालयाबाहेर ऑक्सिजन तुटवडा असल्याची नोटीस लावली आहे. तसेच ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे दुसरीकडे रुग्णाला उपचारासाठी दाखल करा असं देखील सांगण्यात येत आहे. याच दरम्यान दिल्लीतील बत्रा रुग्णालयात ऑक्सिजन अभावी 12 जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याच दरम्यान इंडिया टुडेने उच्च स्तरीय विशेष तज्ज्ञांशी चर्चा केली आहे.
दिल्लीच्या बत्रा रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉक्टर एससीएल गुप्ता यांनी "माझ्या आयुष्यातली ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. ऑक्सिजन नसल्याने रुग्णांचा मृत्यू होत आहे. कोरोना रुग्णावर उपचार करताना ऑक्सिजन, औषधं आणि लसीकरणाची गरज आहे. पण यापैकी काहीच उपलब्ध नाही. सरकार म्हणतं देशात ऑक्सिजनचा मुबलक साठा शिल्लक आहे. पण तरीदेखील रुग्ण मरत आहेत. न्यायपालिका की प्रशासन? हा देश नेमकं कोण चालवत आहे माहिती नाही" अशा शब्दांत गुप्ता यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
"सरकार गेल्या 14 महिन्यांत नेमकं काय करत होतं? कोणीही काहीही शिकलेलं नाही. मेकशिफ्ट रुग्णालयं हा पर्याय नाही. तुम्ही तिथे ऑक्सिजन पाठवत आहात, पण नीट उभारण्यात आलेली रुग्णालयं नाहीत. कृपया आम्हाला ऑक्सिजन द्या, त्यासाठी आम्हाला भीक मागायला लावू नका, प्रत्येत 10 ते 12 रुग्णालयांसाठी नोडल अधिकारी असला पाहिजे. आपतकालीन परिस्थितीत 15 ते 20 मिनिटांत ऑक्सिजन उपलब्ध झाला पाहिजे जेणेकरुन लोकांना जीव गमावावा लागणार नाही" असंही म्हटलं आहे.
कर्नाटक सरकारच्या कोविड टास्क फोर्सचे सदस्य असणारे डॉक्टर विशाल राव यांनी राज्यात आरोग्यासंबंधी उत्तम पायाभूत सुविधा असल्याचं म्हटलं आहे. राज्यातून देशभरात पुरवठा केला जात असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. पण कर्नाटकमध्येच मागणीत दुपटीने वाढ झाली असल्याने समस्या निर्माण झाल्याचं ते म्हणाले आहेत. याशिवाय वाहतूक एक मोठी समस्या असल्याचा उल्लेख त्यांनी केला. उत्पादकांना सर्व राज्यांसाठीचे वाटप वाढवावे लागतील, तरच ही समस्या दूर होईल. त्यांना वाहतुकीसाठीदेखील पाठबळ दिले पाहिजे. ऑक्सिजन घेऊन जाणाऱ्या वाहनांसाठी ग्रीन कॉरिडोर आवश्यक आहेत असंही म्हटलं आहे.
वैद्यकीय तज्ञ अरुण सेठी यांनी छोटे दवाखाने, नर्सिंग होम येथे ऑक्सिजन उपलब्ध अशून त्यांसंबंधी डेटा तयार करण्याची गरज बोलून दाखवली आहे. मोठ्या रुग्णालयांमध्ये त्यांची स्वत:ची ऑक्सिजन निर्मिती क्षमता असली पाहिजे. लोकांना त्यांच्या दरवाजापर्यंत ऑक्सिजनचा पुरवठा का होऊ शकत नाही? गरज नसतानाही रुग्णालयामध्ये कशाला धाव घ्यायची? अशी विचारणा त्यांनी केली आहे. देशात कोरोनामुळे दोन लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.